एटीएममध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला

November 20, 2013 3:50 PM0 commentsViews: 3093

20 नोव्हेंबर : बंगळुरू शहरात एका एटीएममध्ये एका महिलेवर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सव्वा सात वाजता घडली. ही महिला एटीएममध्ये पैसे काढून बाहेर येत असताना अचानक एक व्यक्ती एटीएममध्ये आत शिरली आणि आतून शटर ओढून घेतले. आपल्यासोबत काय घडतंय हे कळण्याच्या अगोदरच त्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून पिस्तुल काढून त्या महिलेला धमकावले. तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने बॅगेतून कोयता काढून तिला धमकावत पैसे काढण्याची मागणी केली मात्र महिलेनं नकार दिल्यामुळे त्याने तिच्यावर कोयत्याने वार केले आणि तिथून पळ काढला. अंगावर शहारे आणणारा हा प्रकार एटीएमच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाला. ही घटना घडल्यानंतर एटीएमबाहेर रक्त येताना दिसल्यावर ही घटना उघड झाली. ज्या महिलेवर हल्ला झाला तिची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे या एटीएमपासून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. पण याहूनही धक्कादायक म्हणजे ज्यावेळी महिलेवर हल्ला झाला तेव्हा एटीएमबाहेर सुरक्षारक्षकच नव्हता. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

close