कांद्याचा आता नाही वांदा, कांदा 30 रु.किलो !

November 20, 2013 7:36 PM0 commentsViews: 325

Image img_140472_onion_240x180.jpg20 नोव्हेंबर : गेली दोन महिने कांद्याने सर्वसामान्यांचा चांगलाच वांदा केला होता आता मात्र कांद्याचे दर कमी होत असल्याचं चित्र आहे. आठवड्याभरात कांद्याचा भाव आता 30 रुपयांपर्यंत खाली आले आहे. कांद्याची आवक वाढण्यासोबतच वाढीव किमान निर्यात दरामुळे ही घसरण होत असल्याचं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे.

दोन महिन्यापूर्वी परतीच्या पावसामुळे कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे कांद्याची आवक घटली होती त्यामुळे बाजारात कांद्याचे भाव नव्वद ते शंभर रुपयांपर्यंत पोहचले होते. यामुळे हॉटेल, किचनमध्ये ‘कांदा बंदी’ लागू झाली होती अजूनही ती कायम आहे. तर दुसरीकडे कांद्याने दिल्लीकरांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. दिल्लीत कांद्याने शंभर रुपये प्रति किलो दर गाठला होता. यासाठी दिल्लीकरांना महाराष्ट्राकडे धाव घ्यावी लागली होती. या काळात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कांद्याचा वांदा काही दिवसच राहिलं असं आश्वासन दिलं होतं.

आता कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचा वांदा दूर होत असल्याचं चित्र आहे. नवीन कांदा बाजारात येऊ लागल्यानं कांद्याच्या भावात या आठवड्यात मोठी घसरण झालीय. गेल्या आठवडयात सरासरी 35 रुपये किलो असणारा कांद्याचा भाव या आठवड्यात 30 रुपयांपर्यत खाली आलाय. जर ही दरवाढ अशीच घसरत राहिली तर कांद्या उत्पादकांवर पुन्हा नामुष्की येण्याची शक्यता आहे.

close