बीड बँक घोटाळ्याने घेतला शेतकर्‍याचा बळी

November 21, 2013 8:27 PM0 commentsViews: 722

शशी केवडकर , बीड

21 नोव्हेंबर : बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्यामुळे एका शेतकर्‍याचा बळी गेलाय. या शेतकर्‍याने आयुष्यभराची पुंजी जिल्हा बँकेत ठेवली पण जेव्हा त्याला पैशांची खरी गरज होती तेव्हा मात्र त्याच्या कुटुंबाला एक पैसाही मिळू शकला नाही. त्यामुळे या शेतकर्‍याच्या मृत्यूला बँकेत घोटाळा करणारेच जबाबदार आहेत.

बीड जिल्हयातल्या माजलगाव तालुक्यात दिगंबर कोरडे या शेतकर्‍याचा उपचाराअभावी मृत्यू ओढवला. जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवलेले पैसे कॅन्सरसारख्या आजारातही उपचारासाठी मिळू शकले नाहीत. कोरडेंनी मुलीचं लग्न आणि म्हातारपणाचा आधार म्हणून जिल्हा बँकेत एक लाख 87 हजार रुपये मुदत ठेव म्हणून ठेवले होते. पण पुढार्‍यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे बँक डबघाईला आली. ठेवीदारांना ठेवी मिळणंही अशक्य बनलंय.

स्वत:च्या ठेवींचे पैसे मिळावे म्हणून बँकेचे उंबरठे झिजवले, राजकारण्यांच्या मिन्नतवार्‍या केल्या पण काही उपयोग झाला नाही. शेवटी जमीन गहाण ठेऊन पैसे मिळाले पण तोपर्यंत उशीर झाला होता. शेतकर्‍यांनी काबाडकष्ट करुन पै पै जमवली, सुरक्षेसाठी जिल्हा बँकेत ठेवली पण या जनतेच्या पैशावर राजकारण्यांनी डल्ला मारलाय. या पैशांवर गब्बर झालेले मात्र मोकाट आहेत.

close