तेजपाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

November 22, 2013 3:28 PM0 commentsViews: 377

tarun tejpal22 नोव्हेंबर : तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपावर कारवाई करत गोवा पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले असून तेजपाल यांच्या चौकशीसाठी पोलिसांचे पथकही रवाना झाले आहेत. तेजपाल यांनी चौकशीत सहकार्य केले नाही तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्र्यांनीही दखल घेतली असून गोवा पोलिसांना अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आलेत.

दरम्यान, आरोपांचा तपास करण्यासाठी तहलकाने त्यांच्या अंतर्गत समिती स्थापन केली आहे. मात्र, संबंधित महिला पत्रकाराला पोलीस तक्रार करायची नाहीये, असं तहलकातर्फे सांगण्यात आले होते. पण तेजपाल यांच्यावरच्या आरोपांचे गंभीर स्वरूप पाहता, हे प्रकरण एवढ्यावर थांबणार नाहीये. तेजपाल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना आज कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

गोवा सरकारने गुरूवारीच पोलीस तपासाचे आदेश दिले असून यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहेत. पोलिसांनी ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा प्रकार घडला, तिथले सीसीटीव्ही फूटेज मागवले आहेत. तसंच तहलकाकडून या प्रकरणाशी संबंधित इतर तपशील आणि महिला पत्रकाराने तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादकांना केलेल्या ईमेलची कॉपीही मागवली आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे आणि प्रेस कौन्सिलला याची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.

तेजपाल यांचं निवेदन
“मी पोलीस आणि सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करेन. घडलेल्या घटनेचे सर्व तथ्य मी त्यांच्यासमोर ठेवेन. सीसीटीव्ही फूटेज मिळवून त्याची तपासणी करावी आणि ते प्रसिद्ध करावे अशी विनंती मी समितीला आणि पोलिसांना करतो. त्यामुळे घडलेला प्रकार स्पष्टपणे सर्वांसमोर येईल.”

close