आता बोला, बाल भिकार्‍यांची रोजची कमाई दीड लाख !

November 22, 2013 5:21 PM0 commentsViews: 3286

begars22 नोव्हेंबर : तुम्ही नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी बस स्थानकावर बसची वाट पाहत उभे आहात आणि तितक्यात एक लहान मुलगा निरागस चेहर्‍यांनं तुमच्यासमोर भिकेसाठी हात पुढे करतो, तुम्ही एकदा हटकल्यानंतर तो एक दोन रुपयांसाठी दया याचना करतो, त्यांचं वय पाहुन तुम्हालाही दया येते आणि खिशातून दोन-चार रुपये देऊन तुम्ही मोकळे होतात. सर्व सामान्यांसोबत घडणारा हा नेहमीचाच प्रसंग. पण धक्कादायक बाब म्हणजे ही जी लहान मुलं भिक मागतात त्यांचं दररोजच उत्पन्न हे जवळपास 1 लाख 68 हजार इतकं असल्याचं समोर आलं आहे. एखाद्या उच्चभ्रु आयटी कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यालाही याचा हेवा वाटावा असा हा ‘पोलखोल’ सर्व्हे समोर आलाय. विशेष म्हणजे हे लखपती भिकारी पुण्यात सापडले आहे.

राज्याची सांस्कृतीक राजधानी पुणे शहरात ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागणार्‍या बाल भिकार्‍यांचा संपर्क मैत्री संस्थेच्या वतीने एक सर्व्हे करण्यात आला. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष अतिशय धक्कादायक असल्याचं मत संपर्क मैत्री संस्थेचे म्हणणं आहे. पुणे शहरातल्या वेगवेगळ्या 48 चौकात हा सर्वे करण्यात आला. पुणे शहरातल्या 48 चौकात दर दिवशी 480 मुलं भीक मागतात. या सगळ्या मुलांचं दर दिवसाचं उत्पन्न जवळपास 1 लाख 68 हजार आहे, तर महिन्याला हे उत्पन्न 33 लाख 74 हजार इतका आहे. वर्षाला पुणेकरांच्या खिशातून ही मुलं जवळपास 4 कोटी 4 लाख 88 हजार रूपयाची भीक घेतात असं या सर्वेत पुढे आलंय.

शहरात बालकांनाकडून भीक मागण्याच्या व्यवसाय करवणारी टोळी सक्रीय असल्याचा दावा संपर्क मैत्री संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. शासन बाल हक्काची योग्यरित्या अंमलबजावणी करत नसल्यानं या बाल भिकार्‍यां शोषण होत आहे असा आरोपही या संस्थेनं केलाय. कुणाच्याही वाट्याला दारिद्र्य आयुष्य येणं ही दुर्देवाची बाब. यावर अनेक जण मात करून यशस्वी होतात पण या दारिद्र्याच्या काळोखात फसलेल्या गोरगरीबांच्या जीवांचा व्यवसायासाठी वापर केला जात असल्याची शर्मेची बाब या प्रकरणामुळे समोर आलीय. या अगोदरही मुंबईसारख्या शहरातही असे प्रकार समोर आले पण आता पुण्यातही अशी टोळी सक्रिय झाल्याचा दावा मैत्री या संघटनेनं व्यक्त केलाय.

पुण्यातले बालभिकारी

  • - 48 चौकांमध्ये रोज 480 मुलं भीक मागतात
  • - बालभिकार्‍यांचं रोजचं उत्पन्न 1.68 लाख रुपये
  • - बालभिकार्‍यांचं महिन्याकाठी उत्पन्न 33.74 लाख रुपये
  • - वर्षाला बालभिकारी 4 कोटींची भीक घेतात

close