‘आम आदमी’त काँग्रेसच्या माजी नेत्यांनाही तिकिटं !

November 22, 2013 7:07 PM0 commentsViews: 423

22 नोव्हेंबर : राजकारणातली घाण स्वच्छ करण्यासाठी हाती झाडू घेऊन आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या रिंगणात उडी
घेतलीये पण, पूर्वी काँग्रेस आणि भाजपमध्ये असलेल्या नेत्यांना ही आम आदमी पार्टीने तिकिटं दिली आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतून अरविंद केजरीवाल आपली राजकीय कारकीर्द सुरू करत आहेत आणि दिल्लीचे तख्त हवे असेल तर आपल्या सैन्यात योग्य शिलेदार हवे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षाने जशे ऑटो ड्रायव्हर, आरटीआय कार्यकर्ते आणि माजी पोलीस शिपाई यांना उमेदवारी दिलीय. तसेच पूर्वी काँग्रेस किंवा भाजपमध्ये असलेल्या नेत्यांनाही पक्षाने तिकिटे दिली आहे.

विकासपुरी मतदारसंघातले विद्यमान नगरसेवक महिंदर सिंह यादव गेली 12 वर्ष भाजपच्या ओबीसी सेलचे जनरल सेक्रेटरी होते. निवडून येण्याची क्षमता बघूनच आपल्याला तिकीट मिळाल्याचे महिंदर सिंह सांगतात. विनोद कुमार बिनी हे काँग्रेसशी गेल्या तीन वर्षांपासून संलग्न आहेत आणि दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेत. त्यांनाही आम आदमी पार्टीने लक्ष्मीनगरमधून तिकीट दिले आहे.

भाजप सोडून आम आदमी पक्षात गेलले गुलाब सिंह यांना पक्षाने मतियाला भागातून उमेदवारी दिली. आम आदमी पार्टीचे सर्वात वादग्रस्त उमेदवार म्हणजे देश राज राघव. राघव यांच्याविरोधात लोकायुक्तांची चौकशी सुरू असून यावरून विरोधकांनी आम आदमी पक्षावर तोफ डागली आहे. सत्ता काबीज करायची म्हणजे जिंकून येणारे उमेदवार हवेच आणि यामुळेच जुन्या आणि नव्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टीने केल्याचे दिसून येत आहे.

close