अंधश्रद्धेपोटी पतीने ठेवलं पत्नीला महिनाभर उपाशी

November 25, 2013 4:38 PM0 commentsViews: 2490

25 नोव्हेंबर : अंधश्रद्धेपोटी कुणी काय करेल याचा नेम नाही. पुण्यात अंधश्रद्धेपोटी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला महिनाभर उपाशी ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. अखेर हा प्रकार महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे कार्यकर्ते राहुल तुपे यांच्या निदर्शनास आला आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्या महिलेची तिच्या पतीच्या तावडीतून सुटका करून ससूण रुग्णालयात दाखल केलं आहे.

पुण्यात हडपसरमध्ये येथील रहिवारी रामनाथ देशमुख या व्यक्तीनं निव्वळ अंधश्रद्धेपायी स्वतःची पत्नी कुमुदिनी यांचा मानसिक आणि शारिरीक छळ घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे रामनाथ हे सुशिक्षित आहेत. गेल्या महिन्याभरापासून त्यांनी आपल्या पत्नीला उपाशी ठेवलंय. हे जोडपं गेल्या 17 वर्षांपासून हडपसरमध्ये राहतं. पण, त्यांच्या घरात वीज सुद्धा नाहीये. काही वर्षांपूर्वी रामनाथ देशमुख अहमदनगरच्या मिरावली बाबाकडे गेले होते. त्यानंतर त्यांच्या वागण्यात फरक पडला.

त्यांनी कित्येक महिन्यांपासून पत्नीला घरात डांबून ठेवलं… शेजार्‍यांनी काही खायला दिलं, तरी ते पत्नीला मारहाण करत असत. आमची टीम देशमुख यांच्या घरी पोहोचली तेव्हा, कुमुदिनी यांची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यांच्या घरात खायला काहीही नव्हतं. पहाडावरचे मिरावली बाबा येतील आणि तेच आपल्याला जेवायला वाढतील, असं ते पत्नीला सांगत असत. या जोडप्याला तीन मुलं होती, त्यापैकी दोन मुलांचा मृत्यू झालाय. मात्र, ती परत येतील असंही रामनाथ यांना ठामपणे वाटतंय. मात्र, या प्रकरणी अजून तक्रार दाखल झालेली नाही.

close