मुंबईचे समुद्र किनारे अजूनही ‘राम भरोसे’ !

November 25, 2013 8:46 PM0 commentsViews: 227

उदय जाधव, मुंबई

25 नोव्हेंबर : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पण अजुनही मुंबईचे मरीन पोलीस दल सक्षम झालेले नाही. समुद्र किनार्‍यावरील पोलीस स्टेशन असो नाहीतर समुद्रात गस्त घालणार्‍या स्पीड बोट्स सगळ्याच बाबतीत पोलीस अपुरे पडत आहेत.

मुंबई शहर हे चारही बाजुने समुद्राने वेढलेले आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली समुद्रामार्गे दहशतवादी हल्ला झाल्या नंतर, सरकारने समुद्र किनार्‍यांची सुरक्षा वाढवण्याची घोषणा केली होती. पण आज पाच वर्षानंतरही मुंबईचे किनारे असुरक्षित आहेत. कारण मुंबईच्या मरीन पोलिसांना दिलेल्या स्पिड बोटी पूर्ण कार्यक्षमतेने गस्त घालत नाहीत.

महाराष्ट्राच्या 750 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनार्‍यांच्या सुरक्षेसाठी फक्त 27 स्पिड बोटी आहेत. त्यापैकी 10 स्पिड बोटी मुंबईच्या किनार्‍यांच्या सुरक्षेसाठी आहेत. पण प्रत्यक्षात यापैकी आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये, आठ ते दहा बोटीच गस्त
घालण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या किनार्‍यांवर तैनात असतात. कधी कधी तर त्यापैकी अनेक बोटी बिघडल्यामुळे एकाच ठिकाणी पडुन असतात.

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने सुरक्षेचे केलेले दावे कसे फोल ठरले आहे, त्यांची कबुली एका प्रकारे गृहमंत्र्यांनीही दिलीय. मुंबईवरच्या दहशदवादी हल्ल्यानंतरही सरकारने कोणताच धडा घेतलेला नसल्याचे दिसत आहे. सरकार फक्त सक्षम सुरक्षेच्या घोषणा करते पण प्रत्यक्षात मात्र सुरक्षा राम भरोसेच असल्याचे चित्र आहे.

close