आरुषी हत्येप्रकरणी जन्मदात्यांना जन्मठेप

November 26, 2013 4:23 PM0 commentsViews: 794

talwar26 नोव्हेंबर : आरुषी-हेमराज हत्येप्रकरणी अखेर जन्मदात्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुर्मिळातील दुर्मिळ अशा या घटनेची नोंद करत सीबीआयच्या विशेष गाझियाबाद कोर्टाने तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कलम 302 खुनाचा गुन्हा, कलम 201 पुरावे नष्ट करणे, कलम 203 खोटी माहिती देणे या कलमाखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुरावे नष्ट करण्याप्रकरणी 5 वर्षांचा तुरुंगवास, खोटी माहिती दिल्याप्रकरणी एक वर्षांची शिक्षाही कोर्टाने सुनावली. सोमवारी या प्रकरणात राजेश आणि नुपूर तलवार यांना दोषी ठरवण्यात आलं होतं.

आज मंगळवारी गाझियाबादमध्ये कोर्टात दुपारी 2 वाजेपासून युक्तीवादाला सुरूवात झाली होती. तासभर चाललेल्या युक्तीवादानंतर राजेश आणि नुपूर तलवार या दोघांनाही फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली होती. तर तलवार दाम्पत्याने दयेची मागणी केली होती. मात्र कोर्टाने या प्रकरणी तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अलाहाबाद हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं तलवार दाम्पत्यांनी सांगितलं.

डॉ राजेश आणि नुपूर तलवार या गुन्ह्यांखाली दोषी

 • - कलम 302 – म्हणजेच हत्या करणे
 • - कलम 201 – अर्थात पुरावे नष्ट करणे
 • - कलम 203 – म्हणजे गुन्हा झालाय हे माहीत असूनही खोटी माहिती देणे

घटनाक्रम

 • 16 मे 2008 – आरुषी तलवार हिचा नोएडातल्या घरी खून
 • 17 मे 2008 – तलवार हाऊसच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला
 • 23 मे 2008 – आरुषीचे वडील राजेश तलवार यांना दुहेरी खुनाबद्दल अटक
 • 31 मे 2008 – प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
 • 29 डिसेंबर 2008 – सीबीआयने राजेश तलवार यांना संशयित आरोपी म्हणून जाहीर केलं पण त्यांच्याबद्दल पुरावा नाही
 • 30 एप्रिल 2011 : नुपूर तलवार यांना अटक
 • 25 मे 2012 – गाझियाबाद कोर्टाने राजेश आणि नुपूर तलवार यांच्यावर खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याचे आरोप ठेवले
 • 18 ऑक्टोबर 2013 – तलवार दाम्पत्याने तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून सीबीआय ने युक्तिवाद संपवला
 • 25 नोव्हें. 2013 – आज दुहेरी खून खटल्यात तलवार दाम्यत्य दोषी
 • 26 नोव्हेंबर 2013 – तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा
close