पवारांना एमसीएचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास मनाई

November 26, 2013 5:56 PM0 commentsViews: 2356

sharad pawar26 नोव्हेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए निवडणुकीचा आखाडा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जिंकला असला तरी मैदानाबाहेरच्या सामन्यात पवारांना धक्का बसलाय. मुंबई सत्र न्यायालयाने शरद पवारांना एमसीएचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास मनाई केली आहे.

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी एमसीएच्या निवडणुकीत सदस्यत्व रद्द केल्यानंतर कोर्टात अपील केली होती आज यावर सुनावणी झाली. कोर्टाने आपला निर्णय देत पवारांना अध्यक्ष म्हणून काम करण्यास मनाई केली असून आपली बाजू मांडण्यासाठी पवारांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली.

मागील महिन्यात 18 ऑक्टोबर रोजी एमसीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. पण त्यांची निवड होण्याअगोदर मोठं नाट्य घडलं. राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन दिग्गज नेते एमसीएच्या मैदानात उतरल्यामुळे निवडणुकीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं.

एमसीएच्या निवडणुकीत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी ‘एंट्री’ केल्यामुळे शरद पवार विरुद्ध मुंडे असाच सामना रंगला होता. मात्र एमसीएने गोपीनाथ मुंडेंचं मुंबईत कायमस्वरुपी वास्तव्य नसल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. या प्रकरणी मुंडेंनी मुंबई सत्रात अपील केली होती. तसंच आपला अर्ज अवैध ठरवण्यामागे पवारांच्याच माणसांचा हात आहे असा आरोपही मुंडेंनी केला होता.

मुंडेंचा अर्ज बाद झाल्यामुळे शरद पवारांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र पवारांनी एमसीएच्या मैदानात बाजी जरी मारली असली तरी मैदानाबाहेरच्या सामन्यात पवारांची आज ‘विकेट’ पडलीय. कोर्टाने आता आपली बाजू मांडण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली असून पवार आपलं अध्यक्षपद कसं कायम राखतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close