कणकवलीत का झाला राडा?

November 26, 2013 8:33 PM0 commentsViews: 2981

दिनेश केळुसकर, रत्नागिरी

26 नोव्हेंबर : कणकवलीत काँग्रेस आणि शिवसेनेतला वाद पुन्हा उफाळून आला. त्याला निमित्त होतं काँग्रेसच्या नियोजित आमने सामने कार्यक्रमाचं.. हा कार्यक्रम पोलिसांनी रोखला आणि शिवसैनिकांना चोपून काढलं. आता उद्धव ठाकरे कणकवलीत दाखल झाल्याने हा वाद चिघळणार अशी चिन्ह आहेत. नेमका काय आहे हा वाद आणि त्याचं राजकारण याचा हा स्पेशल रिपोर्ट.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातच्या विकासासाठी नारायण राणेंनी काय केलं असा सवाल करत शिवसेनेने काँग्रेसला विचारत खुल्या चर्चेचं आवाहन दिलं आणि नेहमीप्रमाणे नारायण राणेंचा पारा शिगेला पोहोचला.

शिवसेनेने 17 प्रश्न काँग्रेससमोर ठेवले होते आणि त्या उत्तरांची काँग्रेसने तयारीही केली होती. पण पोलिसांनी कणकवलीतील शांतता बिघडेल म्हणून आमने-सामनेसाठी आलेल्या शिवसेनेच्या वैभव नाईकांना ताब्यात घेतलं. आणि तिथेच ठिणगी पडली. काँग्रेसने या प्रश्नांची उत्तरं तर दिल्ली पण प्रश्न विचराणार्‍यांचे बेकायदेशीर धंदे असल्याचा आरोपही केला.

नाथ पै आणि मधू दंडवते यांच्यासारख्या समाजवादी खासदाराची आणि कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धनाची ही कर्मभूमी कणकवली. जिथे विचाराचा सामना विचाराने करण्याची परंपरा खूप वर्षांपुर्वीच खंडीत झाली. तिथे आमने-सामने सारख्या कार्यक्रमातून जर राजकीय आरोप प्रत्यारोपच जर होत असतील तर जनतेला यातून काय मिळणार हा खरा प्रश्न आहे.

एकंदरीत निवडणुकाजवळ आल्यामुळेच हे सगळे वादविवाद सुरू झाले असले तरी पुन्हा एकदा कणकवली आणि सिंधुदुर्ग अशांत होऊ नये एवढीच अपेक्षा सर्वसामान्यांची आहे.

close