आरुषीच्या हत्येमागचा हेतू अनुत्तरीतच !

November 26, 2013 10:35 PM0 commentsViews: 3100

26 नोव्हेंबर : देशभरात गाजलेल्या आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडाप्रकरणी आज साडे पाच वर्षांनंतर शिक्षा ठोठवण्यात आली. आरुषीचा खून तिच्याच आईवडिलांनी केला, हे सोमवारी कोर्टात सिद्ध झालं होतं. या दोघांना आज गाझियाबादच्या विशेष सीबीआय कोर्टाने जन्मठेपेची म्हणजे आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून या दोघांना दोषी ठरवण्यात आलं असलं, तरी या हत्याकांडामागचा उद्देश काय होता, या प्रश्नाचं उत्तर मात्र निकालानंतरही अनुत्तरीतच राहिलंय. पाहूया याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट…

आरुषीच्या जन्मदात्यांनाच कोर्टाने तिच्या खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 15 मे 2008 च्या रात्री नॉयडामधल्या तलवार कुटुंबाच्या बंगल्यात आरुषी आणि हेमराज या दोघांचा खून डॉ.राजेश आणि नुपूर तलवार यांनीच केल्याचं कोर्टात आधीच सिद्ध झालं होतं. हत्याकांडप्रकरणी राजेश आणि नुपूर तलवारना विशेष सीबीआय कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा ऐकताच तलवार पतीपत्नीला कोर्टात रडू कोसळलं. या शिक्षेवर समाधानी असल्याचं सीबीआयनं म्हटलंय.

कोर्टात युक्तिवाद सुरू होताच सीबीआयनं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना असल्याचं सांगत तलवार पतीपत्नीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच सीबीआयनं दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.

सोमवारी शिक्षा सुनावल्यानंतर राजेश आणि नुपूर तलवारची दासना जेलमधली रात्र खडतर गेली. जेलमध्ये तलवारांची रात्र झोपेशिवाय गेल्याची माहिती आहे. नुपूर तलवारला तर उच्च रक्तदाबाचा त्रासही झाल्यानं डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला.

तलावरांचे वकील आता या निकालाला अलाहाबाद हायकोर्टात आव्हान देणार आहेत. पण एक प्रश्नाचं उत्तर मात्र निकालानंतरही मिळालेलं नाहीय. अखेर तलवार पतीपत्नीनी आपल्या मुलीचीच हत्या करण्याएवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागचा हेतू काय होता?

अशी सुनावली शिक्षा

 • - कलम 302 – म्हणजेच हत्या करणे – जन्मठेप
 • - कलम 201 – अर्थात पुरावे नष्ट करणे – 5 वर्षांचा तुरुंगवास
 • - कलम 203 – म्हणजे गुन्हा झालाय हे माहीत असूनही खोटी माहिती देणे – एक वर्षाचा तुरुंगवास

आरूषी हत्याकांड निकाल

 • - आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासारखा हा खटला नाही
 • - या खटल्याकडे पाहता, त्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देणंच योग्य वाटलं.
 • - हा गुन्हा त्यांनीच केला आहे याविषयी कोणताही संशय नाही
 • - खरंतर पालकच मुलांचे उत्तम रक्षणकर्ते असतात, किंबहुना तसा तो निसर्ग नियम आहे. पण ह्या घटनेत जन्मदातेच मुलांचा कर्दनकाळ ठरल्यानं या नात्याला काळीमा फासली गेलीय
 • - यात संशय घ्यायला जागा नसली, तरी त्याचा गुन्हा सिद्ध करण्यास कोणताही अडथळा झाला नाही
 • - आत्तापर्यंत जेवढ्या हत्या झाल्या, त्यामागे काहीतरी उद्देश होताच हे त्याकडे पाहिलं की दिसून येतं
 • - आरोपींची मानसिक स्थिती तपासण्यात यंत्रणेला अपयश आलंय. पुरावे पाहता त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती, असं म्हणता येणार नाही
 • - या गुन्ह्यात सक्षम आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर, आरोपींनी जे शस्त्र वापरलं ते सापडलं नाही म्हणून आरोपी निर्दोष ठरत नाहीत
 • - मिळालेल्या पुराव्यानुसार आरोपींनीच ही हत्या केल्याचं सिद्ध होतंय. आरोपींनी हत्येनंतर आरुषीचं गुप्तांग स्वच्छ केलं. पायर्‍यावर पडलेल्या रक्ताचं डाग पुसून टाकले. हत्येसाठी वापरलेलं हत्यार लपवून ठेवलं. त्यानंतर आरुषी आणि हेमराज यांचे मोबाईल्सही त्यांनी फेकून दिले.

 

close