ऊस दराबाबत शेतकरी संघटना अधिक आक्रमक

November 27, 2013 9:53 AM0 commentsViews: 1064

sugarcane_13364f27 नोव्हेंबर : ऊस दराबाबत आता शेतकरी संघटना अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत. एकीकडे कराडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आज अधिक तीव्र होणार असल्याच चित्र आहे तर दुसरीकडे सांगलीत ऊस आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. काल रात्री संतप्त शेतकर्‍यांनी संगलीतल्या मध्यवर्तीय प्रशासकीय इमारतीवर दगडफेक केली. प्रशासकीय इमारतीच्या मुख्य दरवाजाच्या काचा फोडण्यात आल्या असून त्यानंतर इथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

कराड ऊस आंदोलन पेटत चालले आहे असून आंदोलकांनी पोलिस व्हॅनसह 40 वाहनांची मोडतोड केलीय. तर पाचवड फाट्यावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वारणा भागातही उसाचे ट्रॅक्टर अडवण्यात आले आहेत.

ऊसप्रश्नी राज्यातल्या सर्वपक्षीय समितीने काल मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मात्र या बैठकीतून महाराष्ट्राच्या हाताला काहीही लागले नाही. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगट या संदर्भात निर्णय घेणार आहे. हा मंत्रीगट येत्या 10 ते 15 दिवसात आपला निर्णय देणार असल्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे तिन्ही मंत्री उपस्थित नव्हते. या बैठकीत पंतप्रधानांनी शरद पवार यांचा उल्लेख केल्याची माहिती समजते.

दरम्यान, उसाला 3 हजार रूपयांचा पहिला हप्ता द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा कायम आहे. दर निश्चित होईपर्यंत कारखाने सुरूच होऊ द्यायचे नाहीत अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती, इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्यासह केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या सगळ्या वादातून आता अंग काढून घेतंय असा याचा अर्थ काढला जात आहे.

close