तेजपालच्या जामीन अर्जावर सुनावणी

November 29, 2013 10:02 AM0 commentsViews: 128

tarun tejpal29 नोव्हेंबर : तरुण तेजपाल यांनी गोव्याच्या सेशन्स कोर्टाकडे दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर 2.30 वाजता सुनावणी होणार आहे पण तोपर्यंत तेजपालना अटक होणार नाही. 20  हजारांच्या बाँडवर कोर्टाने तेजपालना तात्पुरता दिलासा दिलेला आहे. दरम्यान तरुण तेजपाल दुपारी अडीच वाजताच्या विमानाने गोव्याला जाणार आहे.

 

तरुण तेजपाल या प्रकरणात गोवा पोलिसांना सगळे सहकार्य करणार असून त्यांनी तसं पत्र गोवा पोलिसांना लिहिल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले. आज शुक्रवारी सकाळी गोवा पोलिसांनी दिल्लीतल्या तेजपालच्या घरी छापा टाकला. तेजपाल सोबतच ग्रेटर कैलाश, गुरगाव आणि न्यू फ्रेंड्स कॉलनीतही गोवा पोलिसांनी छापे टाकले.

 

लैंगिक अत्याचारप्रकरणी आज शुक्रवारी गोवा पोलिसांची टीम तपास घेत तरुण तेजपालच्या दिल्लीतल्या घरी तपास घेत पोचली पण त्यांना न घेताच बाहेर पडली. रातोरात तरुण  तेजपाल गायब झाल्याने पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्माण झाले आहेत.  तेजपाल नेमका कुठे आहेत, की ते फरार झालेत याविषयी आता संभ्रम निर्माण झालेत. गोवा पोलिसांची टीम सकाळी 6 वाजता दिल्लीत पोचलेली. 7 जणांच्या या टीमने जवळपास दीड तास तेजपालच्या घराची झडती घेतली.

 

तेजपालना कोण क्षणी अटक होणार हे गोवा पोलिसांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. तसच गोवा कोर्टाने तेजपाल यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट ही जारी केले आहे. तेजपाल त्याच्या राहत्या घरी न सापडल्यामुळे गोवा पोलिस आता त्याच्या बहीण, मित्र आणि इतर नातेवाईकांच्या घरीही छापा टाकण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेजपाल चौकशीत शामील न झाल्याने आता आपल्याला खुले असून आता तेजपालची अटक अटळ असल्याचे गोवा पोलिसांनी म्हटलं. तरुण तेजपालला फरार घोषित करून मालमत्ता जप्तीचा पर्यायही पोलिसांकडे आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून आपण तेजपालची वाट पाहू शकत नाही, असं गोवा पोलिसांनी म्हटलं.

 

गोवा पोलिसांनी तेजपालला चौकशीसाठी काल गुरूवारी दुपारपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. पण, गोवा पोलिसांनी बजावलेला समन्स उशिरा मिळाले असं कारण पुढे करून तेजपालने हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. तो गोवा पोलिसांनी नाकारला. पण, आपण उद्या चौकशीसाठी हजर होऊ, असे तेजपालकडून सांगण्यात आले. पण, दिल्लीहून गोव्याला पोहोचायला लागणारा वेळ गृहीत धरूनच समन्स बजावलं असल्याचे गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओ.पी. मिश्रा यांनी सांगितलं. तेजपालच्या विरोधात पुढची कारवाई आधीच सुरू केली असल्याचेही गोवा पोलिसांनी म्हटलं.

 

दरम्यान, तेजपालने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज आज मागे घेतला. या एकूणच घडामोडींमुळे तेजपालला आता कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पण, आपण चौकशीसाठी हजर राहू, असा फॅक्स गोवा पोलिसांना पाठवल्याचे तेजपालच्या वकिलांनी सांगितले.

close