चारा छावण्यांकडून 11 कोटींचा दंड वसूल

November 30, 2013 4:33 PM0 commentsViews: 477

chara scam30 नोव्हेंबर : सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात उघडलेल्या चारा छावण्यांवर तब्बल 11 कोटी 36 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई राज्य सरकारनं केली आहे. त्यावरुन या प्रकरणात राजकारणी आणि अधिकारी यांच्या संगनमतानं सुमारे 70 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. त्यामुळे या चारा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राज्य जलसंधारण परिषदेचे सल्लागार प्रफुल्ल कदम यांनी केली आहे.

मागील उन्हाळ्यात संपूर्ण राज्याला दुष्काळाचा मोठ्या झळा सहन कराव्या लागल्यात. यात सोलापूर जिल्हाही होरपळून निघाला होता. हंडाभर पाण्यासाठी मैल-मैल पायपीट करावी लागत होती. एकीकडे माणसांचे हाल होत असताना जनावरांचेही अतोनात हाल होत होते. राज्य सरकारने तातडीने पावलं उचलून राज्यभरात चारा छावण्या सुरु केल्यात.

सोलापूरमध्ये अशा 72 चारा छावण्या उभारण्यात आल्यात. यावर तब्बल 270 रुपये कोटी खर्च करण्यात आले. मात्र इथंही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. बोगस जनावरं दाखवणे, छावण्यांना कुंपण नसणे, छावणीत जनावरांसाठी सावलीची सोय नसणे, बारकोड नसणे या कारणांमुळे राज्य सरकारने थेट दंडात्मक कारवाई केली. वर्षभरात 72 पैकी 66 चारा छावण्यांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 11 कोटी 36 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 छावणीतला चारा घोटाळा

– सांगोल्यात चारा छावणीसाठी 270 कोटींचा खर्च
– वर्षभरात 72 पैकी 66 चारा छावण्यांवर दंडात्मक कारवाई
– 11 कोटी 36 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई
– बोगस जनावरं दाखवणे, छावण्यांना कुंपण नसणे, छावणीत जनावरांसाठी सावलीची सोय नसणे, बारकोड नसणे या कारणांमुळे कारवाई

close