धक्कादायक, जवानाच्या कुटुंबाला टाकले वाळीत !

November 30, 2013 4:57 PM0 commentsViews: 1482

javan mahad30 नोव्हेंबर : जात पंचायतीच्या नावाखाली कारगिलच्या युद्धात सीमेवर जीवाची बाजी पणाला लावणार्‍या सैनिकाच्या कुटुंबाला तब्बल 24 वर्षे वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात घडलीय. बबन गायकवाड असं या सैनिकांचं नाव आहे. या प्रकरणी माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर बबन गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यापैकी 9 जणांना अटक केलं आहे.

गायकवाड कुटुंबीय हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आसनपोई गावाचे रहिवासी आहे. बबन गायकवाड यांनी 30 वर्षं लष्कर देशाची सेवा केली. कारगिल युद्धात ते सहभागीही होते. मात्र ज्या देशासाठी प्राणाची बाजी लावली त्यांच्याच जन्मभूमीत त्यांच्या कुटुंबीयांना वाळीत टाकलं गेलं. याला कारण होतं, बौद्धविहार समाज मंदिराच्या खर्चाचा अहवाल. 1989 मध्ये हे बौद्ध विहार बांधण्यात आलं होतं.

विहाराच्या खर्चाचा हिशेब मांगितला म्हणून गावकीनं त्यांना 10 हजारांचा दंड ठोठावत वाळीत टाकलं आणि या कुटुंबाशी कुणीही संबंध न ठेवण्याचे फर्मान सोडलं. गायकवाड यांनी 8 नोव्हेंबर 13 रोजी गावकीच्या सदस्यांकडे विनवणी केली. मात्र गावकीनं दंड भरावाच लागेल जर नाही भरला तर वाळीत टाकलं जाईल अशी धमकी दिली. बबन गायकवाड यांनी भारतीय सैन्यात 30 वर्ष सेवा केली. आपल्या प्रगती पाहून गावकीनं आपल्याविरोधात ही कारवाई केली असं गायकवाड यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे याच कुटुंबातली प्रतीक्षा ही उत्कृष्ट क्रीडापटू आहे. तिला वेटलिफ्टिंग, कुस्ती, बॉक्सिंग या प्रकारात अनेक सुवर्णदपकंही मिळाली आहेत.

पण कुटुंबाला वाळीत टाकल्यामुळे आणि समाजाकडून मिळणार्‍या अपमानास्पद वागणुकीमुळे या कुटंुबाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. अखेरीस आपल्यावर होत असलेल्या व्यथा त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे मांडली. प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला वाचा फोडली. या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून 9 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

close