दाभोलकर खून प्रकरण : पुरावे नाही म्हणून कुणालाही क्लीन चिट नाही-गृहमंत्री

November 30, 2013 4:48 PM0 commentsViews: 370

Image img_239382_rrpatil34_240x180.jpg30 नोव्हेंबर : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात आतापर्यंत पुरावा सापडला नाही याचा अर्थ कुणाला क्लीन चीट दिली असा होत नाही अजून तपास सुरु आहे. सर्व बाजूने तपास सुरु आहे असं राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितलं.

या प्रकरणी सरकारमध्ये अस्वस्थता आहे. दाभोलकरांचे मारेकरी लवकरात लवकर पकडले जावे अशी सरकारचीही भूमिका आहे. यासाठी पोलिसांना लवकर तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही कबुलीही त्यांनी दिली.

शुक्रवारी पुणे क्राईम ब्रांचने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. या प्रतिज्ञापत्रात दाभोलकरांच्या खुनामागे पुरावे नसल्यामुळे कोणत्याही धर्मांध शक्तीचा हात नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. यावर आज शनिवारी पुण्यात गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र ज्या दिवशी दाभोलकरांचा खून झाला होता त्याच्या काही तासानंतरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोलकर यांची हत्या पूर्वनियोजित कट होता. ज्या विचारसरणीतून महात्मा गांधींची हत्या झाली होती, त्याच प्रवृत्तीने दाभोलकरांची हत्या झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली होती.

दाभोलकरांच्या खुनामागे धर्मांध संघटनेचा हात आहे का ? अशी शक्यताही पोलिसांनी पडताळून पाहिली होती तसा तपासही झाला. आता पोलिसांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रात धर्मांध शक्तीचा हात नाही असं म्हटलं असताना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी याचा अर्थ कुणालाही क्लीन चिट देण्यात आली नाही असा अर्थ होत नाही असं सांगितल्यामुळे या प्रकरणाचा आणखी गुंता वाढलाय.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं स्पष्टीकरण

  • - या प्रकरणी सरकारमध्ये अस्वस्थता
  • - पोलिसांना तपास लवकर करण्याचे आदेश दिले
  • - तपासाला उशीर होतोय याबाबत सरकारनं पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली
  • - अजून फार काळ थांबता येणार नाही
  • - केंद्रीय एजन्सीजची मदत घेण्याची सरकारची तयारी
  • - क्लीन चिट देण्यात आली नाही असा अर्थ होत नाही
close