‘पथेर पांचाली’ ते ‘अपूर पांचाली’

November 30, 2013 6:35 PM5 commentsViews: 602

nileema kulkarni ibn lokmat- नीलिमा कुलकर्णी सिनिअर करस्पाँडंट, IBN लोकमत

‘अपूर पांचाली’ … आता तुम्ही म्हणाल की मी चुकतेय काहीतरी…’पथेर पांचाली’ असं म्हणायचं असेल कदाचित. सत्यजित रेंचा अविस्मरणीय सिनेमा. पण नाही, मी ‘अपूर पांचाली’ बद्दलच बोलतेय. ‘अपूर पांचाली’ हा नवा बंगाली सिनेमा कौशिक गांगुली यांनी दिग्दर्शित केला आहे. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाली. ‘पथेर पांचाली’मध्ये अपू साकारलेल्या सुबीर बनर्जींची कथा. सुबीरजी हे खरं तर जगविख्यात बालकलाकार. परंतु या कलाकाराने पथेर पांचाली नंतर एकही सिनेमात काम केले नाही. घरची हलाखीची परिस्थिती, त्यामुळे सरकारी नोकरी करून निवृत्त झाले.

दैवदुर्विलास म्हणावा की, काय पण सुबीरजींच्या आयुष्याला अपूची शोकात्मिका जणू चिकटली होती. पथेर पांचाली,अपूर संसार आणि अपराजित – सत्यजित रेंच्या ट्रायोलोजी मध्ये अपूवर जे शोकात्म प्रसंग ओढवले तेच प्रसंग सुबीर जींनी खऱ्या आयुष्यात भोगले. ‘पथेर पांचाली’मध्ये अपुच्या लहानपणीच अर्धांगवायूने दीर्घकाळ आजारी असलेल्या वडिलांचे निधन होतं. तर सुबीर जींचे वडील ही  अर्धांगवायूने दगावतात.

 

अपुच्या पत्नीसारखीच सुबीर जींची सुंदर पत्नी. अपूर संसारमधील शर्मिला टागोर सारखी देखणी आणि निरागस. सिनेमात अपुची पत्नी,मुलं झाल्यानंतर मरण पावते.सुबीर जींची पत्नी बाळ गेल्याने निराशेच्या खाईत लोटते. अखेर ही निराशाच तिचा बळी घेते. सुबीर जी पत्नीवियोगाने हळहळतात आणि पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतात. ‘अपूर पांचाली’ या सिनेमात सुबिरजीची कथा हळूहळू उलगडत जाते.
apur panchali
सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूट मधील एक विद्यार्थी सुबीर जींकडे येतो. जर्मनीला सुबीर जींचा जगविख्यात बालकलाकार म्हणून सत्कार होणार असतो. त्यासाठी हे निमंत्रण. पण हे निमंत्रण सुबीर जी प्रथम नाकारतात. ‘अपू म्हणजे तुम्हीच ना?’ असं कोणीही विचारलं तर ते नकार देत असत. वास्तवाला जळूसारखा चिकटलेला अपू त्यांना नकोसा झाला होता.

 

पण तो विद्यार्थी  अखेर सुबीर जीना बोलतं करतो आणि सुबीर जींची जीवनकहाणी आपल्यासमोर उलगडते. ‘अपूर पांचाली’ मध्ये सुबीर जींची कथा ‘पथेर पांचाली’ आणि ‘अपूर संसार’ यातील प्रसंगातून समोर येते. सत्यजित रेंबद्दल सुबीर जी भरभरून बोलतात. ४ वर्षं सुरु असलेलं शूटिंग, सत्यजित रेंनी कलाकारांवर मुलासारखं केलेलं प्रेम. ते सांगताना सुबीर जी भावूक होतात आणि अखेर जर्मनीला जाण्यास तयार होतात.

 

तरुणपणीच्या सुबीर जींची भूमिका परम्व्रता चटर्जीने साकारलीय. त्याचा संयत अभिनय हृदयाला स्पर्शून जातो. अपुपासून दुरावलेले सुबीर जी अपुमुळेच जर्मनी ला जातात. अपुची शोकांतिका सुबीर जींच्या आयुष्याशी बेमालूम योगायोग साधते. रील लाईफ आणि रिअल  लाईफ यातला अनोखा मेळ दिग्दर्शक कौशिक गांगुलीने सुरेख रित्या मांडलाय. जागतिक सिनेमांमध्ये नावाजलेली अपू ट्रायोलोजी आणि नवा बंगाली सिनेमा ‘अपूर पांचाली’ हा दुग्धशर्करा योग आवर्जून पाहा. ते पाहून सिनेप्रेमींच्या एका डोळ्यात हसू आणि दुसर्‍या डोळ्यात आसू तराळेल. तमाम बालकलाकारांना श्रद्धांजली वाहण्याचा कौशिक गांगुलीचा हा प्रयत्न नक्कीच गौरवास्पद आहे.

 • Kanchan Karai

  आता हा सिनेमा आम्हाला कधी पाहायला मिळतो ते बघायचं. धन्यवाद निलीमा.

  • Neelima Kulkarni

   Thanks Kanchan for reading my blog..I am also waiting to see the film again.

 • Ritwika Das

  Neelima , though I couldn’t read and understand the language very
  well , I could get what you have written. And as a Bengali , I feel
  really proud and happy for a Bengali film being appreciated like this even before its release ,in a language spoken in another part of the country. It’s Marathi ,right?

  • Neelima Kulkarni

   Yes Ritwika..Thanks a lot..Bengali Cinema is always best in content and acting part.We marathi people also appreciate bengali Cinema.I saw Apur Panchali in Iffi film festival at Goa.It was just superb.Great piece of art by Kaushik Ganguly.Must watch for film lovers.

 • Neelima Kulkarni

  Apur Panchali Releasing on 25th April….

close