पुण्यातल्या बेवारस मृतदेहांचं गूढ वाढलंय

February 13, 2009 3:17 PM0 commentsViews: 12

13 फेब्रुवारी , पुणे अव्दैत मेहता पुणे शहरात गेल्या 2 वर्षात किती बेवारस मृतदेह सापडले याबद्दल गूढ निर्माण झालंय. माहितीच्या आधिकाराचा वापर करून मिळवलेल्या तपशिलामध्ये 7 हजार 602 मृतदेह गेले कुठे असा प्रश्न निर्माण झालाय. ससूनमध्ये मृतदेहांच्या अदलाबदलीचं प्रकरण मध्यंतरी गाजलं होतं. पुण्याचे नागरिक उमेश नाईक यांनी महापालिका आणि ससून यांच्यात समन्वय आहे का ? या कुतूहलापोटी ही माहिती मागवली . गेल्या दोन वर्षात पालिकेनं 9,181 बेवारस मृतदेह सापाडल्याची माहिती दिली . तर ससूननं 1579 मृतदेह असल्याचं सांगितलंय. एक नाही दोन नाही तब्बल 7602 मृतदेह गेले कुठे असा संशय निर्माण झाल्यानं ही गफलत कशी घडली ? मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खायचा हा प्रकार आहे का ? याचा उलगडा होणं आवश्यक आहे .ससून रग्णालय आणि मृतदेहांचा एकंदरीत अभ्यास केला तर 7 हजार 602 आकडा महापालिका जास्त सांगते. त्यामुळे मृतांच्या टाळुवरचं लोणी खातंय कोण, असा प्रश्न उमेश नाईक यांनी विचारला आहे. बेवारस मृतदेहाची नोंद पहिल्यांदा ससून हॉस्पिटलमध्ये होते आणि नंतर विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह महापालिकेकडे दिला जातो.ससून आणि महापालिका दोघेही आपल्या माहितीवर ठाम आहेत. " आमच्याकडे बेवारस मृतदेह आणले जातात. नाईकांना जी माहिती दिलीय तीच आमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये तफावत आमच्याकडेतरी झाली नाही, " असं ससून हॉस्पिटलच्या प्रभारी डीन निर्मला बो-हाडे म्हणाल्या. " आमच्याकडे जे रजिस्टर आहेत त्यावरून आम्ही ही माहीती दिलीये. बेवारसी प्रेतांची संख्या 9 हजार 181 आहे आणि ती बरोबर आहे, अशी माहिती पुणे मनपाच्या माहिती अधिकारी वैशाली जाधव यांनी दिली. तब्बल 7602 मृतदेह गायब होण्याची ही गफलत कशी घडली ? मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खायचा हा प्रकार आहे का ? याचा उलगडा होणं आवश्यक आहे.

close