भूखंडाचं श्रीखंड

December 1, 2013 2:23 PM0 commentsViews: 93

आशिष जाधव, मुंबई

1 डिसेंबर : मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणचे सरकारी भुखंड राज्यकर्त्यांनी लाटल्याचे प्रकार काही नवे नाहीत. पण सुमारे 100 कोटी रुपयांचा भुखंड मनमानीपणे केवळ साडे अठ्‌ठ्याण्णव हजार रुपयांना लाटण्यात आलाय. काँग्रेसचे केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेवर ही मेहेरनजर आघाडी सरकारनं दाखवलीय.

मुंबईतल्या अंधेरी-जोगेश्वरीतल्या यादवनगर जवळच्या उच्चभ्रू वस्तीला लागून असलेला हा 2 हजार 821 चौरस मीटरचा भूखंड प्राथमिक शाळेसाठी राखीव होता. पण आता हा सरकारी मालकीचा भूखंड BAG films एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात गेलाय. केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शुक्ला यांच्या संस्थेला हा सुमारे 100 कोटी रुपयांचा भूखंड विकताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारनं सर्व नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप होतोय.

खरं तर राजीव शुक्ला यांच्या संस्थेवर सरकारनं दाखवलेली ही मेहेरनजर एक मोठा घोटाळाच असल्याचं कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. सप्टेंबर 2008 मध्ये सुमारे 100 कोटी रुपये किंमतीचा हा 2 हजार 821 चौरस मीटरचा भूखंड अवघ्या 98 हजार 735 रुपयांना विकण्यात आला. यासाठी नियमबाह्यरितीनं 1976 च्या रेडि रेकनरचा 140 रुपये प्रती चौरस मीटरचा सरकारी दर लावण्यात आला. त्यासाठी एकूण रकमेच्या केवळ 25 टक्के रक्कम राजीव शुक्ला यांच्या संस्थेकडून सरकारनं आकारली. एवढंच नाही, तर मूळ भुखंडालाच लागून असलेला 3 हजार 534 चौरस मीटरचा मैदानासाठी राखीव असलेला आणखी एक भूखंड केवळ 6 हजार 309 रुपयांना भाडेपट्टीवर देण्यात आलाय. हा घोटाळा राजकारण्यांच्या संगनमतानं झाल्यानं याची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली.
मुळचे उत्तर प्रदेशचे असलेले राजीव शुक्ला हे मुंबईच्या कोट्यातूनच राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. त्यामुळे मुंबईतली ही जमीन लाटण्याचे प्रकरण काँग्रेसच्या अंगाशी येऊ शकतं, एवढं मात्र नक्की.

भूखंडाचं श्रीखंड

  • 2 हजार 821 चौरस मीटरचा भूखंड
  • सप्टेंबर 2008 मध्ये 100 कोटींचा भूखंड 98 हजार 735 रुपयांना विकला
  • 1976च्या रेडि रेकनरचा 140 रुपये प्रती चौरस मीटरचा दर लावला
  • राजीव शुक्लांच्या संस्थेकडून 25 टक्के रक्कम सरकारनं आकारली
  • भूखंडाशेजारीच मैदानासाठी 3 हजार 534 चौरस मीटरचा भूखंड राखीव
  • हा भूखंडही केवळ 6 हजार 309 रुपयांना भाडेपट्टीवर देण्यात आला
close