राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिकामं !

December 1, 2013 4:37 PM0 commentsViews: 58

1 डिसेंबर : तरुण तेजपाल प्रकरण म्हणजे कोणत्याही ठिकाणी महिला किती असुरक्षित असू शकतात हे दर्शवणारं अगदी अलिकडचे उदाहरण. महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती नाही. राज्यात महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.

 

मात्र, त्याची दखल घेण्यासाठी असलेल्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद कित्येक महिन्यांपासून रिकामेच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी महिला लोक आयोगाची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे या लोक आयोगाच्या निमंत्रक आहेत. येत्या 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात या लोक आयोगाचे काम सुरू होणार आहे.

 

काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत लोक आयोगाचा मसुदा आणि घटना खुली करण्यात आली. त्यावर राज्यभरातून सूचना मागवण्यात येणार आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या महिला संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. 40 हून अधिक महिलांविषयक कायदे आणि कल्याणकारी योजना राबवण्याबाबत सरकारवर दबाव टाकायला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल असं वर्षा देशपांडे यांनी सांगितलं.

close