शिवसेना हा दलालांचा पक्ष -रावले

December 2, 2013 3:06 PM0 commentsViews: 2989

mohan ravale 4402 डिसेंबर : शिवसेना हा दलालांचा पक्ष होत चाललेला आहे. कंत्राटदारांचा पक्ष झालाय. याला कारण म्हणजे मिलिंद नार्वेकर हा पक्षातला बडवा आहे. नार्वेकर शिवसेनेला खड्‌ड्यात घालायला निघालाय अशी जळजळीत टीका शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी केली. मोहन रावले नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती अखेर आज रावले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन देत पक्षावर टीकेचा ‘बाण’ सोडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यानंतर पुन्हा एकदा एका शिवसैनिकांने आपली नाराजी उघड करत पक्षाची व्यथा चव्हाट्यावर आणलीय. दक्षिण मुंबईत पाच वेळा खासदारकी भुषवणारे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांनी आज पक्षावर तोफ डागली आणि त्यांच्या निशाण्यावर खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर होते.

रावले म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती आता ती राहिली नाही. आता पक्षप्रमुखांना भेटायचं असेल तर अगोदर विभागप्रमुखांना भेटा, दुसर्‍या कुणाला भेटावे लागते. एवढे करून सुद्धा उद्धव यांची भेट होत नाही. मी सेनेचा खासदार असून सुद्धा उद्धव यांनी मला 4 वर्ष भेट दिली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची सेना आता राहिलेली नाही. साहेब सर्वसामान्य शिवसैनिकांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांची काळजी घ्यायचे कोणताही शिवसैनिक भेटायला गेला तर साहेब त्याला भेट द्यायचे नुसती भेट नाही तर त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायचे, मदत करायचे. पण आता तसं होत नाही. शिवसेना आता कोण चालवतं हाच खरा प्रश्न आहे.

आता फक्त विभागप्रमुखांचं ऐकलं जातं, त्यांचं ऐकावं यात दोष नाही पण इतर नेत्यांचं काय? असा सवाल रावलेंनी उपस्थित केला. यानंतर रावलेंनी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे मोर्चा वळवला. नार्वेकर हा पक्षातला बडवा आहे. खुद्द बाळासाहेबांनी त्याचा उल्लेख बडव्याच्या ‘ब’च्या जागी ‘भ’ केला होता. हा नार्वेकर सेना खड्यात घालायला निघालाय. याला लाथ मारुन सेनेतून बाहेर काढा असा आदेश साहेबांनी दिला होता. हे सर्वांना माहित आहे जर हे खोट असेल तर सेनेच्या कोणत्याही नेत्यांनी साहेबांच्या स्मारकाची शपथ घेऊन सांगावे. जर मी खोट बोलत असेल तर राजकारण सोडून देईल असं आव्हानही रावलेंनी दिलं. तसंच मनोहर जोशी यांच्यासोबत जे काही घडले ते अत्यंत दुर्देवी होतं. त्यांच्यासोबत असे वागायला नको हवे होते असंही रावले म्हणाले. विशेष म्हणजे, 22 नोव्हेंबर रोजी रावले यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीमुळे रावले नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र मागिल आठवड्यात उद्धव यांनी मला अस्तनीतले निखारे नको, अशा निखार्‍यांवर मी पाणी टाकणार नाही. ज्यांना सेनेतून जायचं असेल त्यांनी खुशाल जावे असा गंभीर इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. उद्धव यांनी इशारा दिल्यानंतर आज रावले यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली.

close