व्हॅलेंटाईन डेला पुण्यात शिवसेनेची हुल्लडबाजी

February 14, 2009 9:15 AM0 commentsViews: 5

14 फेब्रुवारी, पुणेपुण्यात खडकवासला भागात एकत्र फिरणार्‍या जोडप्यांचं प्रतिकात्मक लग्न लावण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. खडकवासला धरण आणि सिंहगड परिसरात प्रेमी जोडपी व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं मोठ्या संख्येनं येतात. या प्रेमी जोडप्यांपैकी दोघांना खडकवासला – सिंहगड रस्त्यावर शिवसैनिकांनी अडवलं. त्यांच्या डोक्याला मुंडवळ्या बांधल्या आणि त्यांना एकमेकांच्या गळ्यात हार घालायला लावले. त्यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्यात. मात्र याप्रकरणी पुणे पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतलेलं नाही.शिवसेनेच्या या कृत्याचा समाजातल्या सर्व स्तरांतून विरोध होत आहे. " शिवसेनेचे हे कृत्य हास्यास्पद असून व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. राजकीय पक्षाचं काम लोकशाही टिकवण्याचं असून लोकशाही गढूळ करण्याचं नाहीये, अशी प्रतिक्रिया दोघांनी व्यक्त केलीये. पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले यांनीही शिवसेनेच्या कृत्याचा विरोध केला आहे. तर प्रेमाचं अश्लील प्रदर्शन करण्याच्या कृत्याचा शिवसेना निषेध करत आहे, असं पुण्याचे शिवसेनेचे पदाधिकारी नाना वाडेकर म्हणाले.या घटनेवरून तरुण वर्गातूनही संताप व्यक्त केला जात आहे. आगामी निवडणुकांना डोळ्यांसमोर असे उपद्‌व्याप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया संतप्त तरुणांनी व्यक्त केली आहे.

close