पवारांनी कानउघडणी करताच जाधव-तटकरेंची गळाभेट !

December 3, 2013 5:10 PM0 commentsViews: 1553

pawar on tatkare03 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मानापानावरुन, हमरीतुमरीवर आलेल्या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव या दोन दिग्गज नेत्यांची खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या स्टाईलने चांगलीच कानउघडणी केलीय. जे काही वाद असतील ते मिटले पाहिजे, पक्षातल्या वादाची जाहीर वाच्यता नको असा सज्जड दम शरद पवारांनी या दोन्ही नेत्यांसह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय. पवारांनी कानउघडणी केल्यांनंतर सुनील तटकरे आणि भास्कर जाधवांनी गळाभेट घेतली. शरद पवारांनी वडिलकीच्या नात्यानं आमची कानउघाडणी केली अशी प्रतिक्रियाही दोन्ही नेत्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणचे नेते जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यातला वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, दोन्ही नेते एकमेकांवर एकही टीकेची संधी सोडत नव्हते. भास्कर जाधव यांनी चिपळुण इथं एका सभेत सुनील तटकरेंवर टीका केली होती. जाधवांची टीका तटकरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. तटकरे यांनी काही दिवसांनीच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथं पार पडलेल्या गडनदी धरणाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या जाहिराती आणि निमंत्रण पत्रिकेत भास्कर जाधव यांचं नाव छापलंच नाही. त्यामुळे जाधव चांगले संतापले.

आपण गुहागरचे आमदार असूनही आपलं नाव टाकण्यात आलं नाही असा आरोप भास्कर जाधवांनी तटकरे यांच्यांवर केलाय. तटकरे यांनी पक्षवाढीसाठी कुठलाच प्रयत्न केला नाही. त्यांनी पक्ष केवळ घरातच वाढवला असा थेट हल्ला जाधव यांनी चढवला. एकाच विभागातील दोन दिग्गज नेत्यांचा वादाची दखल खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांनी घेतलीय. तटकरे-जाधव प्रकरणी आणि नंदुरबार,धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला झालेला पराभव या निमित्ताने आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत पवारांनी जाधव-तटकरे यांची चांगलीच कानउघडणी केली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप-आपसातील वाद मिटवून घ्या, पक्षातल्या वादाची जाहीर वाच्यता नको असा दम पवारांनी दोन्ही नेत्यांना भरला. त्याचबरोबर राष्ट्रवादीतील इतर नेत्यांनाही हा इशारा लागू असल्याचंही ठणकावून सांगितलं. वाद मिटवा आणि कामाला लागा असे आदेशही पवारांनी दिले. शरद पवारांनी वडिलकीच्या नात्यानं आमची कानउघाडणी केली, आमच्याकडून होणार्‍या चुका त्यांनी दाखवून दिल्यात त्या वडिलकीच्या नात्यानचं अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली. तर यापुढे आमच्या कोणताही वाद होणार नाही अशीच दिलजमाई कायम राहिली अशी ग्वाही तटकरे यांनी दिली.

close