कसाबचं ट्रेनिंग सेंटर सापडलं

February 15, 2009 5:46 AM0 commentsViews: 7

15 फेब्रुवारी, डोरी मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी, मोहम्मद अजमल कसाबचं ट्रेनिंग सेंटर सापडलं आहे. कसाबनं ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं ते घर पाकिस्तानातल्या डोरी या ठिकाणी आहे. कसाबचं ट्रेनिंग सेंटर शोधल्याचा दावा पाकिस्तानमधल्या जीओ टीव्हीनं केला आहे. भारतापासून शंभर किलोमीटरवर पाकिस्तानताल्या डोरी या ठिकाणी कसाबचं ट्रेनिंग सेंटर सापडलंय. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याची तयारी डोरीतल्या घरात झाली आहे, तसं सांगणारे अनेक पुरावे तिथे सापडले आहेत. सद्यस्थितीत डोरीतलं कसाबचं ट्रेनिंग सेंटर पाक पोलिसांनी सील केलंय. या सील केलेल्या घरात ब्लँकेट्स, चटई, इस्लामिक पूजा साहित्य, न्यूज पेपर, भारताचा आणि मुंबई नकाशा, लाइव्ह जॅकेट्स, निरनिराळी पुस्तकं, अरेबिक तसंच फारसी भाषेतली काही हस्त लिखितं, फळा, खाद्यपदार्थ अशा ब-याच गोष्टी जिओ टीव्हीला सापडल्या आहेत. या सापडलेल्या वस्तूंवरून काही लोक त्या ठिकाणी राहत होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंुबईवरच्या हल्ल्यानंतर किमान पंधरा दिवस तरी लोक रहात होते, असं डोरी गावात राहणा-या लोकांनी सांगितलंय. मात्र मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात सहाजणांना अटक केल्याची माहिती तिथल्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी दिली होती. पण आता तिथल्या काही प्रसिद्धीमाध्यमांनी सरकारच्या सुत्रांचा हवाला देऊन अशी कोणतीच अटक झालेली नाही, तर त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा सरकारनं केल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं यामागची पाकिस्तानची दुटप्पी भूमिका स्पष्ट झालीय. तसंच पाकिस्तानात तालिबानी अतिरेकी मोठ्याप्रमाणावर असून, आमचं सरकार तसंच संपूर्ण देशच आज अस्तित्वाची लढाई लढत असल्याची धक्कादायक कबुली पाकिस्तानचे अघ्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीच दिली आहे. अमेरिकेतल्या ' सीबीएस टीव्ही नेटवर्क ' ला दिलेल्या मुलाखतीत झरदारी यांनी कबुली दिलीये. तर मुंबईवरील हल्ल्यात भारताच्या हाती लागलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबला तपासासाठी आपल्या ताब्यात द्या, अशी मागणी कदाचित आम्ही करू, अशी शक्यता पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. कसाब हा पाकिस्तानी नागरिक असून त्याला आम्ही शिक्षा करू, त्याला आमच्या ताब्यात द्या असंही पाकिस्ताननं म्हटलं आहे. यावरून पाकिस्तान किती सारवा सारव करत आहे हे समोर आलं आहे. जिओ टीव्हीचे रिपोर्टर फहीम सिद्दीकी यांना डोरी भागातल्या पाकिस्तानच्या घरात काय काय सापडलं ते व्हिडिओवर पहा.

close