पवारांच्या पंतप्रधानपदाला समाजवादी पार्टीचा पाठिंबा

February 15, 2009 7:56 AM0 commentsViews: 7

15 फेब्रुवारीआशिष दीक्षित समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी सकाळी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर अमरसिंग म्हणाले, पवारांच्या पंतप्रधानपदाला समाजवादी पार्टी पाठिंबा देवू शकते. आणि मुलायमसिंग पंतप्रधान बनणार असतील तर त्याला राष्ट्रवादीचीही हरकत नसेल, असं 'आयबीएन-लोकमत'ला सांगून अमरसिंग यांनी दिल्लीत राजकीय खळबळ उडवली आहे. दिल्लीत नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पावणेचार तास ती बैठक चालली. आगामी लोकसभा निवडणुकीतला जागा वाटपाचा मुद्दा हा त्या बैठकीत अग्रगणी होता. राष्ट्रवादी काँग्रेसची 24 जागांवर उमेदवारी ठाम झाली आहे. तर राज्यात समाजवादी पक्षासाठी एक जागा सोडण्याचीही राष्ट्रवादी पक्षानं तयारी दाखवली आहे. शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रात समाजवादी पक्षाशी युती करावी आणि त्यांच्यासाठी एक जागा सोडावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचं अजून काँग्रेसनं स्वागत केलेलं नाही. पण समाजवादी पक्ष यूपीसाठी किती महत्वाचा आहे, हे पटवून देण्याचा राष्ट्रवादीकडून पुरेपूर प्रयत्न झालाय. त्या दरम्यान समाजवादी पक्षाचे अमरसिंग यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीतून नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव समोर येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमरसिंग यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं , लोकसभेसाठी कशी समीकरणं तयार होतायत आणि यातून कुठलं सोशल इंजिनअरिंग शरद पवार साधणार, याबद्दल उत्सुकता वाढली होती. शरद पवार कित्येक दिवस समाजवादी पक्षाच्या संपर्कात होते. महाराष्ट्रात समाजवादी पक्षासोबत युती करण्याची इच्छा असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या दिल्लीतल्या बैठकीत स्पष्ट केली आहे. तशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसकडे करणार आहे. पण अमरसिंगांनी जी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्या भेटीतून नवी राजकीय समीकरणं समोर येत आहेत. काँग्रेसपासून दुखावलेले युपीएचे घटक पक्ष किंवा युपीएला पाठिंबा देणा-या घटक पक्षांना काँग्रेसच्या बाजूनं वळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कसोशीनं प्रयत्न करत आहे. अणुकरारानंतर डाव्यांचे काँग्रेसशी संबंध खूप बिघडले होते. तर त्या डाव्यांना परत आपल्या बाजूनं आणण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या बैठकीत मान्य केलं होतं. पण सीएनएन – आयबीएनला अमर सिंग यांनी दिलेल्या मुलाखतीत " आमचे काँग्रेसशी असणारे संबंध जवळपास तुटल्याासारखेच आहेत. जोपर्यंत काँग्रेस आम्हाला जा म्हणून सांगत नाही तोपर्यंत आम्ही वेगळे होणार नाहीत " असं स्पष्टपणं सांगितलं होतं. आणि त्यानंतर अमर सिंगानी राष्ट्रवादी काँग्रेसची घेतलेली भेट चर्चेत आली आहे. अमर सिंग – पवार भेटीतून पवार युपीए शिवाय तिसरी आघाडी तयार करण्याच्या पवार प्रयत्नात असल्याचंही स्पष्ट होत आहे. या भेटीवर समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांना विचारलं असता त्यांना नीट काही माहीत नसल्याचं सांगितलं. " अमर सिंग यांनी पवारांशी भेट घेतली हे ठाऊक आहे. पण या भेटीत नेमका काय ठराव झाला ते अद्याप कळलं नाहीये. आगमी निवडणुकांत समाजवादी पक्ष 10 जागांवर मुंबई – महाराष्ट्रातून निवडणुका लढवणार आहे. त्यासाठी समाजवादीचे उमेदवारही तयार आहेत , " असं अबु आझमी म्हणाले. " राष्ट्रवादीला समाजवादी पक्षाशी जुळवून घ्यायचंय यात गैर असं काहीच नाहीये. तसंच उत्तर प्रदेशात काँग्रेसला यायचंय असंही नाहीये. पण या गठबंधनचा फायदा दोन्ही पक्षांना होणारेय, " असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते गुरुनाथ कुलकर्णी यांनी सांगितलंय. काँग्रेसपासून दुखावलेल्या डाव्या पक्षांना आणि समाजवादीला पवारांनी जवळ केलंय. या घटनाक्रमावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी आयबीएन-लोकमतला सांगितलंय. राजकारणात जागा निवडून आणण्याइतकंच महत्व असतं जोडाजोडीच्या राजकारणाला. आणि याच राजकारणाची मेख शरद पवारांनी नेमकी ओळखलीय.

close