तेलंगणाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

December 5, 2013 11:21 PM0 commentsViews: 254

telangana05 डिसेंबर : केंद्रीय मंत्रिमंडळानं तेलंगणाचा मसुदा अखेर मंजूर केला आहे. वेगळ्या तेलंगणा राज्यात 10 जिल्हे असणार आहेत. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज गुरूवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची तब्बल तीन तास बैठक झाली. त्यात या मसुद्याला मंजुरी देण्यात आली.

आता हा मसुदा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. नंतर राष्ट्रपती हा मसुदा आंध्रप्रदेश विधानसभेकडे पाठवतील. या मसुद्यानुसार हैदराबाद ही तेलंगणा आणि आंध्र या दोन्ही राज्यांची 10 वर्षं संयुक्त राजधानी राहणार आहे. दोन्ही राज्यांसाठी एकच राज्यपाल असणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेले दोन सल्लागार असतील. दरम्यान, आंध्रप्रदेशसाठी वेगळ्या राजधानीचा शोध केंद्र सरकार करणार आहे.

या वेगळ्या राजधानीचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारच निधी देणार आहे. दरम्यान, तेलंगणाच्या मुद्द्यावरून हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात तणाव निर्माण झाला होता. रायल तेलंगणाला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बाहेर निदर्शनं केली.विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याने विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

close