दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांचे निधन

December 6, 2013 9:39 AM0 commentsViews: 959

vibe-vixen-nelson06 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेचे ‘गांधी’ नेल्सन मंडेलांचं निधन. 95 वर्षांच्या मंडेला यांचे फुफ्फुसाच्या संसर्गामुळे जोहान्सबर्गमधल्या राहत्या घरी निधन झाले.

दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मंडेला यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. ‘देश आज एका महान सुपुत्राला मुकला आहे’, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्राध्यक्ष झुमा यांनी नेल्सन मंडेला यांना आदरांजली वाहिली.

गेल्या अनेक महिन्यांपासून ‘भारतरत्न’ मंडेला फुफ्फुसांच्या विकाराने आजारी होते. प्रकृतीमध्ये सतत होणार्‍या चढ-उतारामुळे त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेत मडिबा नावाने ओळखल्या जाणार्‍या मंडेला यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले.

नेल्सन मंडेला यांचा 18 जुलै 1918 रोजी एका कृष्णवर्णीय कुटुंबात जन्म झाला. सामाजिक समतेच्या मूल्यांसाठी मंडेला यांनी आयुष्यभर अहिंसेच्या मार्गानंच लढा दिला. वर्णभेदाच्या विरोधात लढा देत असताना आयुष्याची 27 वर्षं तुरुंगवास भोगून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने दक्षिण आफ्रिकेत बदल घडवले होते. नेल्सन मंडेला यांच्या लढ्याची प्रेरणा महात्मा गांधी होते. आफ्रिकेतल्या वास्तव्यात गांधीजींनी कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला. इथूनच प्रेरणा घेऊन नेल्सन मंडेला शेवटपर्यंत लढत राहिले.

गेली अनेक वर्षं ते दक्षिण आफ्रिकेतल्या इस्टर्न केप प्रॉव्हिनन्समधल्या त्यांच्या घरी राहणे पसंत करत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या घराबाहेर गोळा झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 2010 फुटबॉल वर्ल्ड कपदरम्यान लोकांनी त्यांना एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात पाहिलं.

नेल्सन मंडेलांचा जीवनप्रवास

 • - 18 जुलै 1918 : रोलिल्हाल्हा (नेल्सन) मंडेला यांचा जन्म
 •                            महात्मा गांधींकडून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा
 • - 1944         : आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली
 • - 1952         : पहिल्यांदा अटक आणि तुरुंगवास
 • - 1962         : देशाबाहेर पलायन करून अल्जेरियात लष्कराचं प्रशिक्षण घेतलं
 • - 1962         : देशात परतल्यावर पुन्हा शिक्षा आणि तुरुंगवास
 • - 1964         : जन्मठेपेची शिक्षा ठोठावून रॉबेन बेटावर रवानगी
 • - 1990         :आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवरची बंदी उठवली
 • - 11 फेब्रुवारी 1990 : तुरुंगातून 27 वर्षांनंतर सुटका
 • - 1990         : ‘भारतरत्न’ प्रदान
 • - 1991         : शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला
 • - 10 मे 1994 : दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष म्हणून निवड
 • - 1994         : ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ हे आत्मचरित्र प्रकाशित
 • - 1999          : दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार
 • - 2004        : सार्वजनिक जीवनातून निवृत्ती
 • - 2007        : एड्स आणि गरिबीचा मुकाबला करण्यासाठी मुत्सद्दींच्या समूहाची स्थापना

===============================================

संबंधित बातम्या
===============================================

 

close