दादरऐवजी विक्रांतला हेरिटेजचा दर्जा द्या -राज ठाकरे

December 7, 2013 5:55 PM0 commentsViews: 2075

raj arrest warant07 डिसेंबर : दादरला हेरिटेज दर्जा देण्यापेक्षा आयएनएस विक्रांत युद्धनौकेला हेरिटेजचा दर्जा द्यावा असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केलंय. शिवाजी पार्कला हेरिटेजचा दर्जा द्यायला राज यांनी विरोध केलाय. हा प्रस्ताव म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे काही बिल्डरांना फायदा होण्यासाठीच हे सगळं सुरु आहे अशी टीकाही राज ठाकरे यांनी केलीय. राज यांच्या निवास्थानी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकारच्या करंटेपणामुळे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात निर्णायक हल्ला करणारी आणि विजय मिळवून देणारी विमानवाहू युद्धनौका आय.एन.एस विक्रांतचा लिलाव होणार आहे. महाराष्ट्र सरकारने आश्वासन देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे ही ऐतिहासिक युद्धनौका भंगारात जाण्याची वेळ आली आहे ही बातमी आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

यासाठी भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन ‘विक्रांत वाचवा’चा नारा दिलाय. यासाठी त्यांनी संरक्षणमंत्र्यांचीही भेट घेतली. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा व्यवहारात बसत नाही असं स्पष्ट करून विक्रांतचा लिलाव होईलच असं जाहीर केलं. आता या मुद्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून दादरच्या हेरिटेजचा दर्जा देण्याची चर्चा सुरु आहे. राज यांनी याला कडाडून विरोध केला. दादरसारख्या सुंदर परिसराला हेरिटेजचा दर्जा देण्याची गरजच नाही. या हेरिटेजमध्ये सत्ताधार्‍यांच्या इमारती ए 1 च्या जागी ए 2 मध्ये दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यात काही तरी काळबेरं दिसत आहे. मुळात हा प्रस्ताव म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, काही बिल्डरांना फायदा होण्यासाठीच हे सगळं सुरु आहे. त्यांचे असलेले फ्लॅट,इमारती विकल्या जात नाही. हेरिटेजचा दर्जा दिला तर याचा फायदा त्यांना होईल अशी टीकाही राज ठाकरे यांनी केलीय. तसंच दादरला हेरिटेजचा दर्जा देण्यापेक्षा विक्रांत युद्धनौकेला द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

close