‘आम आदमी’ जिंकला !

December 8, 2013 8:42 PM0 commentsViews: 1467

Aam-Aadmi part win08 डिसेंबर : दिल्लीची विधानसभा निवडणूक यावेळी खर्‍या अर्थाने ऐतिहासिक ठरली. भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचा नारा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आम आदमी पार्टीने दिल्लीसारख्या छोट्याशा पण राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या राज्याची राजकीय समीकरणं पुरती बदलून टाकली आहे.

आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष अगदी समजण्याजोगा आहे. आपची झळाळती कामगिरी हे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 70 जागांपैकी आम आदमी पार्टीनं 28 जागांवर यश मिळवलंय. अवघ्या एका वर्षाचं आयुष्य असलेल्या कोणत्याही पक्षासाठी हे यश म्हणजे घवघवीतच म्हटलं पाहिजे. पारंपरिक राजकारणाच्या चौकटीत न बसता आम आदमी पार्टीनं दिल्ली निवडणुकीसाठी रणनिती आखली.

प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामा, लोकशाहीचं शक्य तितकं विकेंद्रीकरण, एका कुटुंबात एकाच व्यक्तीला तिकीट, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराला तिकीट न देण्याचा निर्णय, पक्षनिधीसाठी घेतलेल्या प्रत्येक रुपयाची नोंद आणि त्याचा जाहीर हिशेब ही या पक्षाची वैशिष्ट्यं ठरली.

‘मनी आणि मसल पॉवर’नं बरबटलेल्या भारतीय राजकारणात ही आश्वासनं सुखदच होती. आणि मुख्य म्हणजे मतदारांनी जाणीवपूर्वक त्यावर विश्वास ठेवलाय. लोकसभा निवडणुकीआधी तिसर्‍या आघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आपनंही आघाडीबरोबर यावं यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झालेत.

आपच्या दमदार पदार्पणामुळे दिल्लीचं राजकीय चित्र पुरतं बदलणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही आपच्या यशाची दखल घ्यावी लागणार आहे हे नक्की.

‘आप’चं वेगळेपण

  • - प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामा
  • - लोकशाहीचं विकेंद्रीकरण
  • - एका कुटुंबात एकच तिकीट
  • - गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराला तिकीट नाही
  • - पक्षनिधीच्या प्रत्येक रुपयाची नोंद
  • - पक्षनिधीचा जाहीर हिशेब

close