विदारक वास्तव, अजूनही हाताने मैला उचलला जातो !

December 9, 2013 7:18 PM0 commentsViews: 486

दीप्ती राऊत,नाशिक

09 डिसेंबर : डोक्यावरुन मैला वाहून नेण्याच्या अनिष्ट प्रथेला बंदी घालणारा कायदा केंद्र सरकारने केलाय. 6 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी देशभरात सुरु सुद्धा झालीये. पण, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ही प्रथा आजही बिनबोभाट सुरू आहे. डोक्यावरचा मैला गेलाय, पण तो हातात आलाय. ही व्यथा आहे राज्यातल्या अनेक महापालिकेतल्या आणि नगरपालिकांमधल्या सफाई कामगारांची…

“फावडे, झाडू वेळेवर मिळत नाही. तुटलेलं साहित्य मिळतं, सारं अंगावर उडतं”,”काहीच फरक पडला नाही, परिस्थिती बदलली नाही”

हे शब्दही फिके पडावेत अशी ही दृष्य..ही दृश्य काही दुर्गम भागातली नाहीत. नाशिकच्या देवळाली कॅम्पमधले हे ब्रिटीशकालीन संडास. ब्रिटीश गेले, पण या घाणीपासून सफाई कामगारांची सुटका झाली नाही. सरकारच्या सर्वेक्षणानुसार मात्र देवळालीत असे मैला साफ करणारे कामगार अस्तित्वातच नाही.

अधिकार्‍यांनी गफलत केलीए. हातानं साफ करणं म्हणजे कोणतंही अवजार न घेता साफ करणं असा अर्थ काढला. सर्वेला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न अधिकार्‍यांनी केलाय असा आरोप सर्वेक्षण समितीचे सदस्य सुरेश मारु यांनी केला.

आरोग्यास घातक शौचालयं नष्ट करण्याचे आदेश केंद्र सरकारनं राज्यांना दिले. त्यासाठी शौचालयांचा सर्व्हे झाला. महाराष्ट्र शासनानंही 4 मार्चला परिपत्रक काढून हा सर्व्हे केला. पण त्यात खरं चित्र लपवण्यात आल्याचा आरोप होतोय.

मारु म्हणतात, आजही हे लोक हातानं मैला उचलण्याचं काम करत आहेत. जरी डोक्यावरून नसलं तरी हातानं मैला साफ करण्याचं काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. डोक्यावरचा मैला हातावर आला इतकाच काय तो फरक.

या अमानुष पणाविरोधात दाद मागण्याचं एक हक्काचं ठिकाण होतं ते म्हणजे राज्य सफाई कामगार आयोग. अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आयोग हे महत्त्वाचं साधन म्हणजे हा आयोग. पण राज्य सरकारनं गेल्या 4 वर्षात या आयोगाची स्थापनाच केलेली नाही. एक प्रकारे सफाई कामगारांच्या मानवी हक्कांचंच राज्य सरकार करत असलेलं हे उल्लंघन आहे.

सफाई कामगार आयोगाचे माजी उपाध्यक्ष सुरेश दलोड म्हणतात, 2003 मध्ये मुदत वाढवून दिली, पण सदस्यांची नियुक्तीच केली नाही. विलासराव देशमुखांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत अनेकांकडे पाठपुरावा केला. फाईल गेल्या, पण पुढे काहीच झाले नाही.

तेव्हा आता राज्यातल्या या नरकसफाईची जबाबदारी समाज कल्याण मंत्री तरी घेतील का?

close