‘आम’ राजकारण !

December 9, 2013 10:50 PM0 commentsViews: 684

Arvind Kejriwal09 डिसेंबर : आम आदमी पार्टीनं दिल्लीमध्ये विजय मिळवला आणि एका नव्या युगाच्या राजकारणाची चर्चा सुरु झाली. काँग्रेस आणि भाजप ह्या दोन्ही पक्षांना आम आदमी पार्टीने, त्यांच्या भूमिकेचा आणि राजकारणाचा पुनर्विचार करायची वेळ आणलीय.

आम आदमी पार्टीच्या विजयानंतर नेहमीच्या राजकारणाकडून एकच भावना व्यक्त होत होती…आश्चर्याची. देशाच्या राजकारणातल्या मातब्बरांना आम आदमी पार्टीबद्दल ही नवलाई का वाटतेय ? ह्याला काही कारणं आहेत.

* राजकारणातल्या पैशाच्या वापराला आम आदमी पार्टीने यशस्वी आव्हान दिलं
* प्रचाराचं नवं आणि प्रभावी तंत्र आणलं
* राजकारणात अत्यंत सामान्य माणसांची पण विजयी मोट बांधली
* जात, धर्म, प्रदेश यांचं राजकारण पाहण्याची सवय लागलेल्या लोकांना आम आदमी पार्टी नव्या राजकारणाची झलक दाखवली

आम आदमी पार्टीनं आता सत्तेपेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंद केलंय. खरंतर आम आदमी पार्टीनं आणि भाजपनं सत्ता आणावी असं आव्हान त्यांच्या जुन्या सहकारी किरण बेदी यांनी केलंय.

काँग्रेसनंही प्रस्ताव ठेवलाय. पण ह्या राजकारणातल्या गुगलीला आम आदमी पार्टीनं व्यवस्थित टोलवलंय. आम आदमी पार्टीच्या विरोधी बाकावर बसण्याच्या भूमिकेमुळे भाजपची कोंडी झालीय. झारखंड सारखा दलबदलू राजकारणाला प्रोत्साहन देणं त्यांना शक्य होत नाहीय. त्यामुळेच सत्ता मिळवण्यासाठी अयोग्य मार्ग वापरणार नाही, याची ग्वाही भाजप सतत द्यावी लागतेय.

आम आदमी पार्टीमुळे दिल्लीमध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत झाली. आता त्रिशंकू सत्ता आलीय. विरोधी बाकांवर बसण्याचं जाहीर करत आम आदमी पार्टीनं आपण ‘लंबी रेस का घोडा’ आहोत हा मेसेज दिलाय. पण राजकारण एवढ्यावरच थांबत नाही. ह्यापुढं ते आपली आताची लाट टिकवण्यात यशस्वी होतात का यावर पुढची लढाई अवलंबून आहे.

close