लोकपालसाठी अण्णांचं उपोषण सुरू

December 10, 2013 8:50 AM0 commentsViews: 1107

anna hazare_new10 डिसेंबर : लोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं बेमुदत उपोषण सुरू झालंय. अण्णांनी आज आक्रमक पवित्रा घेतलाय. आता सरकारशी चर्चा नाही. आता आर या पार असा इशारा अण्णांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

केंद्र सरकार जोपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर करत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सुरू राहणार अशी घोषणा अण्णांनी केलीय. राजकारण्यांना आपल्या उपोषणाला हजेरी  लावायची असली तर त्यांनी यावं पण त्यांना स्टेजवर येऊ दिलं जाणार नाही असंही अण्णांना सांगितलं.

संसद ही जनतेसाठी आहे आणि संसदेनं जनतेला जनलोकपालविषयी दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, लोकपाल विधेयक याच अधिवेशनात मंजूर करू असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी म्हटलंय. सामी यांच्या घोषणेनंतर जर असं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो असं अण्णा म्हणाले आहे.

आज सकाळी अण्णा हजारे आपल्या गावी राळेगणसिद्धीमध्ये यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसले आहे. त्या अगोदर राळेगणमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली होती यात शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते अबालवृद्धांनी सहभाग घेतला.

मुंबई,औरंगाबादमधून अण्णांना पाठिंबा

तर दुसरी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा समर्थक समोर आले आहे. औरंगाबादेत अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा समर्थक उपोषणाला बसले आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णा समर्थकांनी उपोषण सुरू केलंय. तर मुंबईतही अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात एक दिवसाचं धरणं आंदोलन आणि उपोषण करण्यात येतंय. यात मुंबई आणि परिसरातील समविचारी समाजसेवी संघटना एकत्र येऊन शांततापूर्ण जनआंदोलन करत आहेत.

 

close