कोल्हापूर-नाशिकमध्ये महामोर्चा

December 10, 2013 8:49 PM0 commentsViews: 241

nasik kolhapur10 डिसेंबर : कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आज शैक्षणिक धोरण आणि वीज दरवाढीविरोधात नागरीक रस्त्यावर उतरले. कोल्हापुरात 12 हजारांहून जास्त शिक्षकांनी मोर्चा काढला. मोर्चामुळे शहरात अनेक भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. राज्य सरकारची शैक्षणिक धोरणं चुकीची आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचं नुकसान होत असल्याचा शिक्षकांचा आरोप आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 900 शाळा बंद ठेवण्यात आल्या.

दुसरा मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात आला. नाशिकमध्ये वीजदरवाढीविरोधात उद्योजक, व्यापारी आणि विरोधकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नाशिकमधल्या निमा,आयमा या उद्योजकांच्या संघटना, वीज ग्राहक मंच, ग्राहक पंचायत या ग्राहकांच्या संघटना आणि शिवसेना-भाजप, सीपीएम हे राजकीय पक्ष यात सहभाग झाले होते.

कोल्हापुरातही हजारो उद्योजकांनी वीज दरवाढीत चक्का जाम आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरची वाहतूकही रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अडवल्यामुळे काही काळ वातावरण तंग झालं होतं. या आंदोलनात व्यापार्‍यांसह नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनात वीज दरवाढ मागे घेतली नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

close