लाल दिव्यांच्या वापरावर कोर्टाचा लगाम

December 10, 2013 11:03 PM0 commentsViews: 754

red light car10 डिसेंबर : सध्या बर्‍याच सरकारी गाड्यांवर लाल दिव्यांचा गैरवापर होताना दिसतोय त्याला आता सुप्रीम कोर्टाने लगाम घातला आहे. घटनात्मक अधिकारी व्यक्तींनीच फक्त लाल दिव्यांचा वापर करावा असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय.

कोर्टाच्या या आदेशामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांना लाल दिवा वापरता येणार आहे. त्यामुळे घटनात्मक पद नसणार्‍या व्यक्तींनी जर लाल दिव्याचा वापर केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायाधीश जी.एस.संघवी आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने दिले आहे.

त्याचबरोबर ऍम्ब्युलन्स, पोलीस आणि इतर इमर्जन्सी सेवांसाठी निळा दिवा वापरावा,असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. लाल दिव्यांचा वापर कोणकोणत्या अधिकार्‍यांसाठी करता येईल, अशा अधिकार्‍यांची, पदाधिकार्‍यांची यादी केंद्र आणि राज्य सरकारनं द्यावी असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे. मात्र, ही यादी राज्य सरकारांनी वाढवू नये असंही कोर्टाने ठणकावून सांगितलं आहे.

close