मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीने थोपटले दंड

December 13, 2013 8:56 PM0 commentsViews: 1347

Image img_217592_ajitpawarresignandcm_240x180.jpg13 डिसेंबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं उघड दंड थोपटले आहे. आता तर विधिमंडळातही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका होतेय. मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती अशीच सुरू राहिली तर महाराष्ट्राचीही दिल्ली होईल, असा इशारा गुरूवारी राष्ट्रवादीनं दिला होता.

तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचा लकवा दिवसेंदिवस वाढतोय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. एवढंच नाही तर हे सरकार लोकांचं आहे, लोकांसाठी निर्णय घेणारं गतिमान सरकार आहे असं दिसलं पाहिजे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय.

एकूणच काय राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा पूर्ण प्रयत्न चालवला आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जसंजसं पुढे सरकतंय तसतसं मुख्यमंत्र्यांविरोधातला राष्ट्रवादीचा राग उफाळून येतोय.

उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके काय बोलले?

“राज्य सरकारचा लकवा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात काँग्रेसकडून राष्ट्रवादीला इशारे दिले जात आहेत. 3 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आले होते तेव्हा काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंनी लोकसभेच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. पण, आता 4 राज्यातल्या विधानसभेचे निकाल पाहता काँग्रेसने राज्यातल्या सर्व 48 जागा खुशाल लढवाव्या, आम्ही आमचं बघून घेऊ.”-अजित पवार

हर्षवर्धन पाटील यांची सारवासारव

दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच काही आमदारांकडून मुख्यमंत्र्यांची अशी कोंडी होत असताना संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादीच्या आमदाराकडून विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्याविरोधात टीका करणं योग्य नाही, निवडणुका जवळ येत आहेत तेव्हा आघाडीतल्या आमदारांना आपली कामं व्हावीत. त्यामुळे आघाडीच्या आमदारांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, असं पाटील यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना म्हटलंय.

close