सरकारी लोकपाल विधेयकावर समाधानी -अण्णा हजारे

December 14, 2013 7:30 PM0 commentsViews: 1057

anna on lokpal14 डिसेंबर : लोकपाल विधेयकाबाबत काँग्रेसने नवी भूमिका मांडल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपाल विधेयकावर समाधान व्यक्त केलंय. लोकपाल राज्यसभेत मंजूर झाल्यास आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी सही केल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं. तसंच अण्णांनी समाजवादी पार्टीला लोकपालला पाठिंबा देण्याच्या विनंती केली आहे.

शनिवारी संध्याकाळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकपाल विधेयक देशाची गरज असून राज्यसभेत लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी काँग्रेस बांधील आहे असं आश्वासन राहुल यांनी दिलं. तसंच सीबीआय लोकपालच्या कक्षेत असेल आणि लोकपालला काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे असंही त्यांनी जाहीर केलं.

राहुल यांच्या भूमिकेनंतर अण्णांनी लोकपाल राज्यसभेत मंजूर झाल्यास उपोषण सोडणार असं स्पष्ट केलंय. पण अण्णांच्या भूमिकेबाबत अण्णांचे माजी सहकारी आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आश्चर्य व्यक्त केला. अण्णांच्या भूमिकेबद्दल मला खूप आश्चर्य वाटतंय. सरकारी लोकपाल विधेयक अण्णा कसं काय स्वीकारू शकतात? सरकारी लोकपाल हे ‘जोकपाल’ आहे. अण्णांची दिशाभूल नेमकं कोण करतंय ? अण्णा काही म्हणोत, आम्ही जनलोकपालसाठीचा आमचा लढा शेवटपर्यंत सुरूच ठेवू असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

close