दिल्ली गँगरेप प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण

December 16, 2013 8:35 AM0 commentsViews: 224

227186_420847034655471_1922193332_n_1_1.storyimage16 डिसेंबर : दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजेच 16 डिसेंबरला रात्री चालत्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी चारही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण अजूनही ‘भय इथले संपत नाही’. आजचा दिवस अनेक निर्भयांच्या सुरक्षेसाठी प्रतिज्ञादिन म्हणून साजरा केला जात आहे.

दिल्ली सामूहिक बलात्कार  प्रकरणी मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर या चारही आरोपींना सामूहिक बलात्कार, हत्या यांसह 13 गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेतल्या बहादूर मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हा दिवस महिलांच्या संरक्षणासाठी प्रतिज्ञादिन म्हणून पाळण्यात यावा, अशी मागणी भाजपचे दिल्लीतील नेते हर्षवर्धन यांनी केली आहे.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत असताना अद्याप स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांत घट झाल्याचे चित्र नाही. कायदा कठोर करूनही वर्षभरात अत्याचाराच्या घटनांत दुप्पट वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. कायद्याचे कवच असूनही महिलावर्ग अजूनही असुरक्षित असल्याचेच अधोरेखित झाले आहे.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाचा घटनाक्रम :

- 16 डिसेंबर 2012 : 23 वर्षांच्या पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर दक्षिण दिल्लीत चालत्या बसमध्ये बलात्कार
- 20 डिसेंबर 2012 : तिहार तुरुंगातल्या ओळख परेडमध्ये मुलीच्या मित्रानं एका आरोपीला ओळखलं
- 21 डिसेंबर 2012 : बिहारमधून अक्षय ठाकूरला अटक
- 23 डिसेंबर 2012 : या खटल्याची सुनावणी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश
- 27 डिसेंबर 2012 : मुलीला उपचारांसाठी सिंगापूरला हलवलं
- 29 डिसेंबर 2012 : मुलीचा उपचारादरम्यान सिंगापूरमध्ये मृत्यू
- 3 जानेवारी 2013 : दिल्ली पोलिसांनी दाखल केलं 1260 पानांचं आरोपपत्र
- 7 जानेवारी 2013 : कोर्टानं इन-कॅमेरा ट्रायलला दिली परवानगी
- 28 जानेवारी 2013 : ज्युवेनाईल जस्टिस बोर्डानं 6 व्या आरोपीला बालगुन्हेगार म्हणून घोषित केलं
- 2 फेब्रुवारी 2013 : फास्ट ट्रॅक कोर्टात पाच आरोपींच्या सुनावणीला सुरुवात
- 28 फेब्रुवारी 2013 : अल्पवयीन आरोपी आढळला दोषी; 3 वर्षांसाठी रिमांड होममध्ये रवानगी
- 11 मार्च 2013 : आरोपी राम सिंहची तिहार तुरुंगात आत्महत्या
- 23 ऑगस्ट 2013 : फास्ट ट्रॅक कोर्टात खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला सुरुवात
- 3 सप्टेंबर 2013 : सुनावणी संपली
- 10 सप्टेंबर 2013 : साकेत कोर्टानं चारही आरोपींना ठरवलं दोषी
- 11 सप्टेंबर 2013 : कोर्टानं 13 सप्टेंबरपर्यंत शिक्षेबाबतचा निर्णय ठेवला राखून
- 13 सप्टेंबर 2013 : साकेत कोर्टानं चारही दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

close