लोकपालवरून अण्णा आणि केजरीवाल आमने-सामने

December 16, 2013 9:35 AM0 commentsViews: 1322

Arvind-web16 डिसेंबर : जनतेच्या हितासाठी आवश्यक असणारे सर्व मुद्दे राज्यसभेत मांडलेल्या लोकपाल विधेयकात असल्याने आपण समाधानी असल्याचे अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मात्र ज्यांना कुणाला हे विधेयक मान्य नसेल त्यांनी उर्वरित मुद्दयांवर स्वतंत्र आंदोलन करावे असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.

राज्यसभेत मांडलेल्या लोकपाल विधेयकात आपण ज्या सूचना केल्या होत्या त्यातल्या बहुतांश सूचनांचा समावेश लोकपाल विधेयकात असून ज्या काही त्रुटी असतील त्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जातील, मात्र त्यासाठी पूर्ण विधेयकच रखडवायला नको असे अण्णा म्हणाले.

सरकारी लोकपाल विधेयकाला अण्णांचे समर्थन पहाता केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. हे विधेयक सक्षम नसून, अण्णा हे सत्ताधार्‍यांना शरण गेले आहेत. त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांची दिशाभूल करत असल्याचेही केजरीवाल रविवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. आपली कोणीही दिशाभूल करू शकत नाही, जे या विधेयकाला विरोध करत आहेत त्यांनीच हे विधेयक वाचले नसावे असा टोला अण्णांनी केजरावालांना लगावला आहे.

दरम्यान राज्यसभेत मांडलेल्या विधेयकामुळे उंदीरदेखील तुरूंगात जाणार नसल्याच्या वक्तव्यावर किरण बेदी यांनी सडेतोड उत्तर देत म्हणाल्या की “या विधेयकाचा आम्ही अभ्यास केला असून विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यावर उंदीरच काय वाघदेखील तुरूंगात जाईल, असे खडे बोल नाव न घेता ‘आप’ला सुनावले.

close