दिल्लीत राष्ट्रपती राजवट?

December 16, 2013 6:57 PM0 commentsViews: 3267

aap and congress16 डिसेंबर : दिल्लीत सत्ता स्थापनेत ‘पहिले आप पहिले आप’मुळे निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्यता नसल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीत सरकार स्थापन करायला कुणीही तयार नाही म्हणून केंद्रीय गृहखात्याकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शिफारस केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पत्राला उत्तर दिलं असून 18 मुद्द्यांपैकी 16 मुद्द्यांवर सहमती दर्शवली असून सत्ता स्थापनेसाठी ‘आप’ला आवाहन केलं आहे.

8 डिसेंबरला दिल्ली विधासभेचा निकाल जाहीर झाला आणि भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. पण बहुमतासाठी 36 जागांचा आकडा भाजपला गाठता आला नाही. त्यामुळे भाजपने दिल्लीत सरकार स्थापन करणार नाही असं स्पष्ट केलं. भाजपने माघार घेतल्यामुळे सत्ता स्थापनेचा मान आम आदमी पार्टीला देण्यात आला. पण आम आदमीकडे 28 जागा असून बहुमतासाठी 8 जागांची गरज आहे. आम आदमीनेही सत्ता स्थापनेसाठी नकार दिला. मात्र दिल्लीत पानिपत झालेल्या काँग्रेसने आम आदमीला पाठिंबा दिलाय.

काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 8 जागा आम आदमीच्या पारड्यात पडल्या तर बहुमतचा आकडा पूर्ण होतो. पण अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आपल्याला का पाठिंबा देतंय हे अगोदर स्पष्ट करावं आणि त्यासोबतच केजरीवाल यांनी दिल्लीबाबत 18 मुद्द्यांवर उत्तर मागवलंय. मात्र राजकीय पक्षांच्या रस्सीखेचेत दिल्लीचे तख्त गेल्या 8 दिवसांपासून सुन्ने आहे. त्यामुळे सत्तेसाठी कुणीच पुढं येत नसल्यामुळे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केंद्रीय गृह खात्याकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत सुचना केली आहे. त्यासोबतच सहा महिन्यासाठी विधानसभा संस्थगित केली पाहिजे असंही त्यांनी सुचवलं आहे. यावर केंद्रीय गृहमंत्रालय याबद्दल विचार करत आहे.

 

‘आप’च्या पत्राला काँग्रेसचे उत्तर

तर दुसरीकडे आम आदमीने विचारलेल्या 18 मुद्द्यांबाबत काँग्रेसने उत्तर दिलंय. काँग्रेसचे दिल्लीचे प्रभारी शकील अहमद यांनी केजरीवाल यांना उत्तर पाठवलं आहे. 18 पैकी 16 मुद्द्यांवर काँग्रेसने सहमती दर्शवली असून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रशासनाचा असून तो सरकारने घ्यायचा असतो यासाठी काँग्रेस पूर्ण सहकार्य देईन. उरलेल्या दोन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे लोकपाल विधेयक आणि दिल्लीला विशेष राज्याचा दर्जा.

 

याबाबत काँग्रेसने स्पष्ट केलंय की, लोकपाल विधेयकाचा निर्णय लवकरच लोकसभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम आदमीचा आक्षेप नसेल तर आमची काहीही हरकत नाही. आणि दिल्लीला विशेष दर्जा देण्याबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे यासाठी आम आदमी पक्षासोबत काँग्रेसही केंद्राकडे मागणी करेल असं काँग्रेसने स्पष्ट केलं. त्यामुळे केजरीवाल यांनी सत्ता स्थापन करावी असं आवाहनही काँग्रेसने केलं.

 

तसंच आम्ही बिनशर्त पाठिंबा देतोय असं आम्ही कधीही म्हटलं नव्हतं असंही काँग्रेसने स्पष्ट केलं. आता यावर आम आदमी उद्या बैठक बोलवली आहे. एकंदरीतच दिल्लीत एकतर राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यायची की दिल्लीत सत्ता स्थापन करायची याचा निर्णय ‘आम आदमी’वर सोपवला आहे. आता ‘आम आदमी’ काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

close