पवार MCA चं कामकाज बघू शकतात : कोर्ट

December 16, 2013 8:24 PM0 commentsViews: 586

sharad pawar16 डिसेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)ची निवडणूक ते कोर्टाच्या सामन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना मात दिलीय. आज मुंबई हायकोर्टाने शरद पवार यांना दिलासा दिलाय. शरद पवार एमसीएचं कामकाज बघू शकतात असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. गोपीनाथ मंुडेंच्या अपीलावर मुंबई सत्र न्यायालयाने पवारांनी एमसीएचं कामकाज बघू नये असा निर्णय दिला होता. तो निर्णय हायकोर्टाने रद्द ठरवला आहे.

एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक गाजली ती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार विरुद्ध भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सामन्यामुळे. गोपीनाथ मुंडे यांनी एमसीएच्या निवडणुकीत उतरुन पवारांना आव्हान दिलं होतं. पण मुंबईत कायमस्वरुपी वास्तव्य नसल्यामुळे मुंडेंचा अर्ज बाद ठरवण्यात आला होता.

एमसीएच्या निर्णयाविरुद्ध मुंडेंनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र मुंडेंचा अर्ज बाद झाल्यामुळे 18 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांची एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र कोर्टाच्या लढाईत पवारांना धक्का बसला. 26 नोव्हेंबर रोजी मुंडेंच्या अपीलावर कोर्टाने निर्णय दिला.

कोर्टाने शरद पवारांना एमसीएचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास मनाई केली. त्यामुळे पवारांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. हाय कोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत पवारांना एमसीएच्या अध्यक्षपदी काम करण्यासाठी परवानगी दिलीय. हायकोर्टाच्या निर्णयामुळे मुंडेंवर पवार भारी ठरले आहे. आता पवारांचा अध्यक्षपदाचा कारभाराचा मार्ग मोकळा झालाय.

close