‘विक्रांत’चा लिलाव तुर्तास टळला

December 16, 2013 11:30 PM0 commentsViews: 298

ins vikrant16 डिसेंबर : ‘आयएनएस विक्रांत’चा 18 डिसेंबरला होणारा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने तांत्रिक मुद्द्यावर विक्रांतचा लिलाव पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहे. आता या प्रकरणी 16 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

विक्रांत युद्धनौकेच्या देखभालीची जबाबदारी राज्य सरकार आणि नौदलावर आहे पण सरकारच्या नाकरर्तेपणामुळे 1971 च्या युद्धात ऐतिहासिक कामगिरी बजावणार्‍या आयएनएस विक्रांत भंगारात निघण्याची वेळ आली होती. विक्रांतची देखभाल करण्यासाठी वर्षाला 500 कोटींचा खर्च आहे. हा खर्च देण्यासाठी सरकारने नकार दिलाय. सरकारने ‘हात वर’ केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विक्रांत वाचवण्यासाठी मुंबई पालिकेनं पुढाकार घेत 100 कोटी देण्याची तयारी दाखवलीय. एवढेच नाही तर मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळंही मदतीसाठी पुढे आली. ‘विक्रांत बचाव’साठी 10 कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त मदत देण्याचा खारीचा वाटा गणेश मंडळांनी उचलला. या प्रकरणी किरण पाईकर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. यावर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने 18 डिसेंबर रोजी होणार्‍या लिलावाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.

close