हा मार्ग धोक्याचा – वांगणी स्टेशनला फूटओव्हर ब्रीज नाहीत

February 17, 2009 2:23 PM0 commentsViews: 76

17 फेब्रुवारी, वांगणीगणेश गायकवाड रेल्वे स्टेशनसंबंधीच्या समस्यांचा आयबीएन लोकमत सातत्यानं आढावा घेतंय. आयबीएन लोकमतच्या या दणक्यामुळे गुरुवारी मुंबई हायकोर्टाने रेल्वे अधिकार्‍यांना फटकारलं. तसंच 4 आठवड्यांच्या आत त्यांना आवश्यक सुधारणा करण्यासही सांगितल्या. रेल्वेचा गलथान कारभार कर्जतजवळच्या वांगणी स्थानकातही पहायला मिळाला. वांगणीच्या फूटओव्हर ब्रीजचं काम पाच वर्षांपासुन रखडून पडलंय. वागंणीला फुटओव्हर ब्रीज नसल्यानं आतापर्यंत अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागलेत. खरं तर रेल्वेचा ट्रॅक ओलांडणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पण वांगणी स्टेशनवरील प्रत्येक प्रवासी हा गुन्हा दररोज करतो. कारण पाच वर्षांपूर्वी सुरू झालेलं फुटओव्हर ब्रीजचं काम अजुनही पूर्ण झालेलं नाहीये. परिणामी गेल्या वर्षभरात ट्रॅक क्रॉस करताना 40 प्रवाशांना त्यांचा जीव गमवावा लागलाय. वांगणी इस्टला स्टेशनजवळच शाळा आहे आणि या अपघातांमध्ये ठार होणार्‍यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच अंध व्यक्तींनाही ट्रॅक क्रॉस करण्याशिवाय पर्याय नसतो. खरं तर वांगणीला अवकाश निरीक्षणासाठी राज्यभरातून खगोलप्रेमींची दर शनिवार-रविवार गर्दी होत असते. वांगणी रेल्वेस्टेशनमधून सेंट्रल रेल्वेला वर्षाला सव्वा कोटी रुपयांचा महसूल मिळतो. पण हा महसूल देणार्‍यांची काळजी मात्र रेल्वेला नाहीये, हीच या स्थानकाची शोकांतिका आहे.

close