देवयानी यांची संयुक्त राष्ट्र महासंघात बदली

December 18, 2013 6:22 PM0 commentsViews: 1452

devyani khobragade18 डिसेंबर : अमेरिकेतल्या भारताच्या उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांची भारताच्या परराष्ट्र मंत्रालायाने संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये कायमस्वरूपी बदली केलीय. या बदलीमुळे देवयानी यांना पूर्ण संरक्षण मिळेल आणि यापुढे भारताची परवानगी घेतल्याशिवाय त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी करता येणार नाही किंवा त्यांना अटक होऊ शकणार नाही. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत वाईट वागणूक मिळाल्याप्रकरणी भारताने खंबीर भूमिका घेतली आहे.

देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल राज्यसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी हा मुद्दा उपस्थित करत भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. भारताला जागतिक व्यासपीठावर कोणीही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणाबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आलीय, असं जेटली म्हणाले. या प्रकरणी उशिरा प्रतिक्रिया दिल्याबद्दल बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी सरकारवर टीका केली. तर, भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्यात अमेरिका कमी पडली, अशी टीका डाव्या पक्षांनी केली आहे.

देवायानी खोब्रागडे यांना व्हिसासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली होती. देवयानी यांना अटक केल्यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज मंगळवारी या प्रकरणी नवीन माहिती समोर आली. देवयानी खोब्रागडे यांना नुसतीच चारचौघांत अटक करण्यात आली नाही, तर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्यावर त्यांचे कपडे उतरवून झडतीही घेण्यात आली.  त्यामुळे भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

close