देवयानींच्या सोबत गैरवर्तणूक झाली नाही – भरारा

December 19, 2013 5:21 PM0 commentsViews: 1074

devyani19 डिसेंबर : अमेरिकेतल्या भारताच्या परराष्ट्र उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांना कोण्यात्याही प्रकारची गैरवागणूक मिळाली नसल्याचं अमेरिकेतील वकील प्रीत भरारा यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे तर दुसरीकडे देवयानी यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक झाली नसल्याचं, देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात केस लढवणारे वकील प्रीत भरारा यांनी एका निवेदनाद्वारे वेगळीच भूमिका मांडलीय.

” इतर आरोपींना मिळणार्‍या वागणुकीपेक्षा बरीच चांगली वागणूक देवयानी खोब्रागडेंना देण्यात आली. त्यांना त्यांच्या मुलांच्या समोर अटक करण्यात आल्याची माहिती खोटी आहे. त्यांना अशाप्रकारे अटक करण्यात आली नाही. खोब्रागडेंना अटक करताना वाच्यता होणार नाही, याची आमच्या एजंट्सनी शक्य तेवढी काळजी घेतली इतर आरोपींप्रमाणे त्यांना बेड्या घालण्यात आल्या नाहीत. त्यांना अटक करणार्‍या अधिकार्‍यांनी नेहमीच्या पद्धतीनुसार त्यांचा फोन काढून घेतला नाही. खासगी कामांची व्यवस्था लावण्यासाठी अधिकार्‍यांनी त्यांना अनेक फोन कॉल्स करण्याची संधी दिली. त्या कारमध्ये असतानाही एजंट्सनी त्यांना फोन कॉल्स करू दिले, इतकंच नाही तर त्यांच्यासाठी कॉफीही आणली आणि काही खाणार का हेही विचारलं देवयानी खोब्रागडे यांची खासगीत एका महिला डेप्युटी मार्शलद्वारे झडती घेण्यात आली हे खरं आहे. पण श्रीमंत असो वा गरीब, अमेरिकन असो वा नसो, प्रत्येक आरोपीसाठी ही प्रक्रिया पाळण्यात येते. ” असं भरारा यांनी आपल्या निवेदनाद्वारे सांगितले आहे.

close