फिल्म रिव्ह्यु : ‘धूम 3′

December 22, 2013 4:43 PM3 commentsViews: 1971

अमोल परचुरे, समीक्षक

बॉलीवूडचा एक नवा नियम आहे…जेवढा जास्त गवगवा तेवढा तो सिनेमा जास्त कंटाळवाणा असतो, अपेक्षाभंग करणारा असतो. ‘धूम 3’ला हा नियम अगदी तंतोतंत लागू होतो. साधारण वर्षभरापासून धूम 3 ची प्रचंड चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉन अब्राहम, हृतिक रोशननंतर चोर असणारा आमिर खान, अमेरिकेतील शुटिंगमध्ये विदेशी तंत्रज्ञानाचा वापर, आमिरबरोबर कतरिना कैफ, एका गाण्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च, टॅप डान्ससाठी आमिरने घेतलेली मेहनत असं सतत धूमबद्दल ऐकायला-वाचायला मिळत होतं. सिनेमा बघून असं वाटतं की, बहुतेक सिनेमाच्या नावात ‘फक्त लहान मुलांसाठी’ असं लिहायला निर्माते विसरले असावेत. खरं तर हल्ली बालचित्रपटसुद्धा खूप मेहनतीने आणि विचारपूर्वक बनवले जातात. याउलट ‘धूम 3′ बनवताना लेखक-दिग्दर्शक-निर्माते यांचं डोकं ठिकाणावर नसणार याची पक्की खात्री वाटते. आमिर खानसारखा अभिनेता जो परफेक्शनिस्ट असल्याचा ढोल वाजवत असतो, त्याने धूमची स्क्रीप्ट वाचलीच नाही की काय असा संशय येतो. एक अगदी नक्की की यशराजच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी हा सर्वात बाळबोध सिनेमा आहे.

काय आहे स्टोरी?
43243
‘धूम’ म्हणजे चोर-पोलिसांचा खेळ हे तर आपल्याला माहितीय. ‘धूम 3′ मध्ये आमिर खान चोर असला तरी व्हिलन आहे वेस्टर्न बँक. भांडवलदारीविरुद्ध तेवढंच एक स्टेटमेंट करायचा प्रयत्न सिनेमात केलाय. विजय कृष्ण आचार्य, ज्याने 2008 साली बनवला होता ‘टशन’सारखा सिनेमा. आता ‘टशन’पेक्षाही प्रचंड बजेट असूनही ‘धूम 3′ मध्ये आणखी बरंच काही अतर्क्य घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय. काही ठिकाणी हा प्रयत्न जमून आला असला तरी बर्‍याच ठिकाणी त्याची क्रिएटिव्हिटी हास्यास्पद झालेली आहे. मुळात, पहिल्या दोन्ही धूममध्ये ऍट्रॅक्शन होतं ते चोरांचं. पोलिसांची आणि सिक्युरिटी कॅमेरांची नजर चुकवून कशी चोरी होते हे बघणं प्रेक्षकांना नक्कीच आवडतं. हॉलीवूडच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ किंवा ‘ओशन इलेव्हन’, ‘ट्वेल्व्ह’ आणि ‘थर्टीन’सारख्या सिनेमात हीच तर खरी गंमत होती, पण तीच गंमत धूम 3 मध्ये मिसिंग आहे.

धूम 3 बघून पडलेले काही प्रश्न -

dhoom 3
1. दि ग्रेट इंडियन सर्कस असं आमिर खानच्या सर्कसचं नाव आहे, पण नेमकी ही सर्कस आहे, बॅले आहे की ऑपेरा आहे?
2. शिकागो पोलीस बँक रॉबरीचा तपास का करू शकत नाहीत आणि त्यासाठी इंटरपोल वगैरे इंटरनॅशनल एजन्सीज सोडून ते थेट अभिषेक आणि उदय चोप्राला का बोलावतात?
3. आमिर खानच्या सर्कसमध्ये करतब दाखवता यावेत यासाठी कतरिना कैफ ऑडिशन देते, पण ही सर्कससाठी ऑडिशन नसून डान्स रिऍलिटी शोची ऑडिशन का वाटते?
4. सिनेमात आमिर खान एकूण तीन वेळा बँक लुटतो, पण तीनही वेळा तो बँक कशी लुटतो हे दाखवण्यापेक्षा बँकेतून बाहेर पडल्यावरचा पाठलाग का दाखवलाय?
5. अभिषेक आणि उदय चोप्राच्या तपासावर नाखूश असलेले शिकागोतल्या बँकेचे अधिकारी त्यांना पुन्हा भारतात जायला सांगतात, त्यानंतरही कोणत्या अधिकारात दोघेजण गुन्ह्याचा तपास करत असतात? देवयानी खोब्रागडे यांच्यासारखी त्यांना अटक का होत नाही?
6. अभिषेक बच्चनची बहादुरी दाखवण्यासाठी त्याच्या एंट्रीला मुंबईतील झोपडपट्टीत जी मारामारी होते, त्याचा सिनेमाच्या कथेशी संबंध काय आणि एवढी मारामारी करून, नासधूस करून अटक करायला आलेला अभिषेक गुंडांना ताब्यात न घेता पळून का जातो?
असे आणखी बरेच प्रश्न किंवा चुका सांगता येतील. मुळात पडद्यावर जे काही दिसतंय त्याचं कुठेच स्पष्टीकरण नसल्यामुळे हा टशनपेक्षाही एक टुकार सिनेमा झालेला आहे.

 

परफॉर्मन्स
dhoom-3-movie-poster-22
धूम 3 च्या संगीताची बाजूसुद्धा कमजोरच आहे. प्रीतमच्या संगीतातली जादू या धूममध्ये कुठेतरी हरवून गेलीय, त्यातल्या त्यात ‘मलंग मलंग’ हे गाणं लक्षात राहू शकतं. पार्श्वसंगीत ऐकताना तर आमिर खानच्याच गुलाम सिनेमाची आठवण होत राहते. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं तर हा पूर्णपणे आमिर खानचा सिनेमा आहे. असं जरी असलं तरी नेहमीच्या आमिर खानची एनर्जी सिनेमात जाणवत नाही. बाईक स्टंट करताना, जादू सादर करताना, टॅप डान्स करताना किंवा ‘मलंग मलंग’ गाण्यात आमिर खानचे एक्स्प्रेशन्स एकसारखेच आहेत. पण जेव्हा स्टोरीमध्ये ट्विस्ट येतात, त्यावेळी आमिरने कमाल केलीय. मुळात आमिर खान टोटल ऍक्शन हीरो नाही यावर ‘धूम 3’ने शिक्कामोर्तबच केलंय.

dhoom1-nov15

कतरिना कैफला तर तीन गाण्यांमध्ये नाचण्याशिवाय बाकी काही कामच नाहीये. तिला फक्त सुंदर दिसायचंय एवढंच दिग्दर्शकाने ठरवून ठेवलेलं असणार. पहिल्या धूममध्ये अभिषेक आणि उदय चोप्रा हे प्रमुख कॅरेक्टर्स होते, पण हळूहळू त्यांचं महत्त्व कमी झालंय आणि आता तिसर्‍या धूममध्ये तर ते अजूनच पुसट झालेले आहेत. अर्थात असं असलं तरी बोरिंग सिनेमात उदय चोप्राची कॉमेडीच थोडा रिलीफ देते. आमिरच्या लहानपणाचं काम करणारा बालकलाकारसुद्धा मस्त भाव खाऊन जातो. जॅकी श्रॉफसुद्धा छोट्याशा रोलमध्येही एकदम करारा काम करतो. एकंदरीत करोडो रुपये खर्च करून आपल्याला काय दिसतं, तर त्याच त्याच रस्त्यावरून वारंवार होणारे पाठलाग, परदेशी लोकेशन्स, चकचकीत सर्कस, डोळे दिपवणारी रोषणाई आणि या सगळ्यात स्टोरीचा अभाव. सिनेमात जमून आलेली एकमेव गोष्ट म्हणजे स्पेशल इफेक्ट्स. पण तेवढ्यासाठी तीन तास सिनेमा सहन करणं हे थोडं जडच जातं.

  • PRAVIN

    BAD REVIEW evdhahi wait nahiye movie

  • Vaibhav Patil

    i think Amol Parchure should direct a film now, also act in it and give music and den write his review on d same.. No story?? I think he dont have any brains to interpret the story.. And Aamirs acting is commendable.. d direction, music is also good.. Overall Dhoom 3 is an awesome movie and different from d previous..

  • Pratik Bhosale

    review dila ahe pan faqt interval paryant baghunch ase vatatey jari Dhoom 3 evdha vegvan nasla tari to evdhahi faltu ani vait nahiye………………..

close