अपार जिद्दीची कहाणी…

December 22, 2013 7:41 PM0 commentsViews: 828

जितेंद्र जाधव, बारामती

22 डिसेंबर : बारामतीमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होणार असं जाहीर झालं आणि लता करे यांनी या स्पर्धेत धावण्याचा निश्चय केला. स्पर्धेसाठी बक्षीस होतं 5 हजार. मोलमजुरी करणार्‍या लताबाईंसाठी ही रक्कम मोठीच होती. लताबाईंच्या कुटुंबाने 4 वर्षापूर्वी रोजगारासाठी बुलडाण्यातलं आपलं गाव सोडलं आणि बारामतीत पिंपळी गावात बस्तान बसवलं. लताबाईंच्या पतीला काही महिन्यांपूर्वी हृदयरोगाचा तीव्र झटका आला. पण दवाखान्याचा भरमसाट खर्च काही परवडणारा नव्हता. डॉक्टरांनी मेडिकल टेस्टसाठी 5 हजार खर्च येईल असं सांगितलं. मॅरेथॉन स्पर्धेविषयी लताबाईंनी ऐकलं आणि त्यांना आशेचा किरण दिसला. त्यांनी स्पर्धेेसाठी नाव नोंदवलं.

लताबाईंना काबाडकष्टाची आणि रोज मैलोनमैल चालण्याची सवय होतीच. त्यांचा स्पर्धेसाठी सराव सुरु झाला. स्पर्धा होती 3 किलोमीटरची, सराव वाढला. जिद्द होती पण मॅरेथॉनच्या आदल्याच दिवशी त्या आजारी पडल्या. पण हरल्या नाहीत, मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा मिळाला आणि लता करे वार्‍यासारख्या धावू लागल्या.

काहीही झालं तरी धावायचं… पहिला नंबर वगैरे कसलीच पर्वा करायची नाही. पायात बुट नव्हते… नऊवारी साडीतल्या लताबाईंना कशाचीच पर्वा नव्हती… कडाक्याच्या थंडीची तरी नव्हतीच नव्हती. काही मिनिटांतच त्यांनी सगळ्यांना मागे टाकलं आणि लताबाईंचा पहिला नंबर आला. त्या मॅरेथॉन जिंकल्या, त्यांच्या आनंदापुढे आकाशही ठेंगणं झालं होतं. मॅरेथॉनची ट्रॉफी आणि 5 हजारांचा चेक हातात होता पण स्पर्धा जिंकण्यापेक्षाही पतीच्या उपचाराला हातभार लागेल यांचा आनंद अधिक होता.

close