‘आम आदमी’ने राखले दिल्लीचे तख्त !

December 23, 2013 8:13 PM0 commentsViews: 446

 23 डिसेंबर : दिल्ली लोकसभेच्या आखाड्यात काँग्रेसला धूर चारणार्‍या आम आदमी पार्टीने अखेर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेण्यासाठी ज्या काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला त्याच काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा आम आदमीने निर्णय घेतलाय. आपच्या नेत्यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पाठिंब्याचं पत्र सोपवलं. 26 डिसेंबरला अरविंद केजरीवाल दिल्लीचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

‘दिल्लीत सत्ता आम आदमी स्थापणार’ या घोषणाकडे आपच्या पाठिराख्यांबरोबरच सामान्य दिल्लीकरांचंही लक्ष होतं. सोमवारी सकाळी आम आदमी पार्टीची बैठक झाली. त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पक्ष स्थापनेनंतर वर्षभरातच सरकार स्थापण्याचा मान आम आदमी पार्टीला मिळालाय. आता अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून 26 डिसेंबरला शपथ घेणार आहेत.

काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी आपचे नेते जनतेमध्ये गेले. तब्बल 280 जनसभा घेण्यात आल्या. 5 लाख लोकांपेक्षा जास्त जणांनी आपली मतं नोंदवली. तब्बल 74 टक्के लोकांनी सरकार स्थापनेसाठी कौल दिला. मात्र, प्रत्येक निर्णयासाठी जनतेचा कौल घेता येणार नाही, असं मत माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी व्यक्त केलंय.

दिल्लीमध्ये आप आदमी सरकार ही देशाच्या राजकीय इतिहासातली ऐतिहासिक घटना आहे. इतकी की यामुळे देशाचं राजकीय वळण बदलेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे राजकीय अभ्यासकांबरोबरच नेत्यांचं आणि सामान्य जनतेचंही आपकडं लक्ष असणार आहे.

 

असा सुटला दिल्लीच्या तख्ताचा तिढा

देशाची राजधानी आणि राजकारणाचं मुख्यकेंद्र दिल्ली.. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत ‘दिल्लीचे तख्त’ कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 70 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकत बाजी मारली. तर आम आदमीने 28 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले आणि गेल्या 15 वर्षांपासून सत्तेचा आनंद लुटणार्‍या काँग्रेसला अक्षरश: जमीनदोस्त व्हावे लागले. काँग्रेसच्या वाट्याला फक्त आठच जागा आल्यात. तर अपक्ष दोन जागांवर निवडून आले. मात्र बहुमताचा 36 चा आकडा गाठणं हा पेच निर्माण झाला. भाजपकडे 32 जागा असूनही आणखी 4 जागा मिळू शकल्या नाही. अपक्षांच्या दोन जागा जरी मिळवल्या तर आणखी 2 जागांचा प्रश्न होताच. आम आदमी पार्टीने आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही असं जाहीर केल्यामुळे हा पेच आणखी चिघळला. अखेर भाजपने सत्तेचं ‘ताट’ दूर सारत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला.

पण सत्ता स्थापनेसाठी कोणताही पक्ष पुढे येत नसल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची हालचाल सुरू झाली. भाजपने माघार घेतल्यामुळे दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या आम आदमीला सत्ता स्थापनेची संधी मिळाली. या संधीचं आम आदमी सोनं केलं. त्यातच काँग्रेसनेही ‘आप’ला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसच्या आठ जागा आणि आम आदमीच्या 28 जागा मिळून बहुमताचा 36 चा आकडा गाठणे हे समिकरण सहज सुटणारे होते. पण काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्यानंतर आम आदमीच्या विरोधात जनतेत नाराजीचा सूर उमटला. सत्ता स्थापनेसाठी आम आदमीही इतर पक्षासारखाच निघाला अशी टीका सर्वत्र होऊ लागली. पण दिल्लीत पुन्हा निवडणुका अथवा राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये याचा निर्णय आम आदमीवरच होता. यावरही आम आदमीने तोडगा काढला आणि दिल्लीकरांना सत्ता स्थापनेचा अधिकार दिला. जवळपास 75 टक्के दिल्लीकरांनी आपला कौल देत आम आदमीच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्यात.

close