28 तारखेला केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा

December 25, 2013 9:19 PM0 commentsViews: 775

Arvind Kejriwal25 डिसेंबर : दिल्लीमधील सरकार स्थापनेवर लागलेलं ग्रहण आता सुटलं आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या परवानगीनंतर आता आम आदमी पार्टी 28 डिसेंबरला सरकार स्थापन करेल. या आधी 26 डिसेंबरला केजरीवाल यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण ‘आप’च्या सत्ता स्थापनेच्या प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली नव्हती. पण आता राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर शपथविधीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. येत्या 28 डिसेंबरला म्हणजे शनिवारी दुपारी 12 वाजता अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. रामलिला मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे.

आपच्या मंत्रिमंडळात अरविंद केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदीया, राखी बिर्ला, गिरीश सोनी, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि सोमनाथ भारती यांचा समावेश असणार आहे.

नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष 28 जागांवर तर काँग्रेस 8 जागांवर निवडून आले होते. ‘आप’ला सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागांची गरज होती, ती गरज काँग्रेसने 18 पैकी 16 अटी मान्य करून बाहेरून पाठिंबा देत भरून काढली. आम आदमी पक्षाने विविध माध्यमांतून घेतलेल्या जनमतामध्ये सुमारे 7 लाख लोकांनी आपली मतं मांडली. त्यापैकी 74 टक्के दिल्लीकरांनी काँग्रेसची मदत घेऊन आम आदमी पार्टीने दिल्लीत सरकार स्थापन करावं, या बाजूने कौल दिला, असं मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि इतर नेते नायब राज्यपाल नजीब जंग यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला होता.

close