मराठी सिनेमा तरुण झालाय…

December 25, 2013 8:33 PM0 commentsViews: 1481

sonali deshpande ibn lokmat- सोनाली देशपांडे,सीनिअर असोसिएट एडिटर,IBN लोकमत

मराठी सिनेमा बदलतोय. मराठी सिनेमा बदललाय.. ही वाक्यं अनेक ठिकाणी आपण वाचतो. आतापर्यंत वाचलीत. पण 2013नं मराठी सिनेमांचं एक वेगळं रूप आपल्यासमोर खुलं केलं..

हे वर्ष होतं तरुणांच्या सिनेमांचं. मग ती तरुणाई 70च्या काळातली असली तरी लोकप्रिय ठरली. दुनियादारी सिनेमाचं यश धक्कादायकच होतं.. काही वर्षांपूर्वी दुनियादारी ही मालिका झीवर सुरू असायची. त्यात संजय नार्वेकर होता. सिनेमात संजय नार्वेकर नसला तरी अंकुश, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर यांचा रेट्रो लूक प्रेक्षकांना आवडला. सिनेमाची गोष्ट आवडली.. प्रत्येकाला आपलं कॉलेज जीवन आठवलं…आणि दुनियादारीनं ना भुतो ना भविष्यति असं यश पाहिलं.. कादंबरी ते मालिका ते सिनेमा हा दुनियादारीचा प्रवास कौतुकास्पद ठरला.

आजच्या तरुणांचे प्रश्न, त्यांची स्पंदनं मांडणारे सिनेमेही आले आणि प्रेक्षकांनी त्याला गर्दी केली.. टाइमप्लीज सिनेमा हा समीर विद्वांसच्या नवा गडी नवं राज्य नाटकावर बेतलेला.. आजची तरुण पिढी ठरवून लग्न करते तेव्हा काय काय घडू शकतं? एकमेकांना समजून घेताना, खर्‍या अर्थानं सहजीवनाचा आनंद घेताना काय काय अडचणी येतात, हे सिनेमात नाट्यमय पद्धतीनं पाहायला मिळालं. आणि अनेक जण त्याच्याशी रिलेट झाले. आपल्या किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यातही असंच घडतंय असं सिनेमा पाहून वाटलं. आणि मग हेच सिनेमाचं यश ठरलं.

लग्न पाहावे करून हाही सिनेमा तरुणांचा. ज्योतिष आणि वास्तव यांच्या कात्रीत सापडलेले हे तरुण… लग्नानंतरचे त्यांचे प्रश्नही नेहमीच्या जीवनात पाहिलेले, काहींनी अनुभवलेले . मग तोही सिनेमा मग आपला वाटला…

मंगलाष्टक वन्स मोअर म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं एकत्र आल्यावर काय काय होऊ शकतं याचं हे उत्तम चित्रण होतं.. नात्यातले तणाव, त्यावरचे उपाय सगळं कसं ओळखीचं वाटणारे ठरलं..
वर्षाच्या सुरुवातीला आलेला प्रेमाची गोष्ट हाही सिनेमा नातेसंबंधांचे अनेकरंगी पैलू दाखवणारा, विचार करायला लावणारा ठरला..

या सगळ्या सिनेमांमध्ये एकच कॉमन गोष्ट होती. ती म्हणजे तरुण.. त्यामुळे हे वर्ष तरुण सिनेमाचं होतं.. एरवी मराठी सिनेमाला नाकं मुरडणार्‍या तरुण वर्गानं आवर्जून या सिनेमांना गर्दी केली. हे सगळे सिनेमे परिपूर्ण होते, असंही नाही म्हणता येणार.. त्यात अनेक दोष होते, त्रुटीही होत्या. पण प्रभावी ठरली ती त्यातली गोष्ट आणि गोष्ट सांगण्याची पद्धत.. आणि वास्तवाशी जुळलेली सिनेमाची नाळ. आणि महत्त्वाचं म्हणजे सिनेमा फिरत होता तो आजच्या तरूणाईभोवती…या सगळ्या गोष्टींनी अनेकांच्या मनाचा ठाव घेतला.

मराठी सिनेमात हे वर्ष होतं सई ताम्हणकरचं, मुक्ता बर्वेचं… स्वप्निल जोशीचं.. उमेश कामतचं…अंकुशचं… मराठी सिनेमा ग्लॅमरसही झाला..
2013मध्ये महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकरच्या कोकणस्थचाही बराच गाजावाजा झाला. पण हा सिनेमा फारसा काही चालला नाही.. सिनेमा नाही म्हणायला रटाळ झाला होता..

पितृऋण सिनेमाचा विषय चांगला होता. पण सिनेमातली बरीच वळणं अपेक्षित ठरली. मिळावं तसं यश सिनेमाला काही मिळालं नाही..असो..
2013मधल्या मराठी सिनेमाचा हा उंचावणारा आलेख अपेक्षा वाढवणारा ठरलाय. त्यामुळे 2014वर जास्त जबाबदारी आलीय. आणि त्यात सिनेमा म्हणजे नुसता ‘टाइमपास’ न ठरता नव्या जाणिवांचं , पठडीबाहेरच्या नात्यांबद्दलचं चित्रण असू दे…नव्या वर्षाकडून ही अपेक्षा ठेवायला आता काहीच हरकत नाही असं वाटतंय.

close